बेळगाव लाईव्ह
पडू दे देवा आकाशातून पाणी..
मंगाईकडे शेतकऱ्यांची आर्त मागणी…
पिकू दे भुई तरारून पुन्हा…
शेतकऱ्याच्या कष्टाची हि कहाणी….!
मंगळवारी सालाबादप्रमाणे वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवीची यात्रा उत्साहात पार पडली. या यात्रेसाठी बेळगावकरांनी मंगाई देवीकडे गाऱ्हाणे घातले. उत्तम पीक-पाण्यासाठी शेतकऱ्यांनी हे गाऱ्हाणे मंगाई देवीला घातले. आणि यावेळी थांबलेल्या पावसाने दमदार आगमन करावे, अशी आर्त मागणीही केली.
जोपर्यंत भुई पिकत नाही, तोपर्यंत कणंग भरत नाही. जोपर्यंत कणंग भरत नाही तोपर्यंत लोकांच्या ताटात अन्न जात नाही. त्यासाठीच हि कणंग भरू दे, नद्या, नाले भरून वाहूंदेत असे मागणे मंगाईदेवीकडे शेतकऱ्यांनी केले. गेल्या ८ – १५ दिवसांपासून शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहात आहेत. मात्र यंदा पावसाने उशीर केला असून तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे.
दमदार पाऊस न झाल्यामुळे शेतकरी विवंचनेत सापडला असून शेतकऱ्यांच्या मनात पाल चुकचुकत आहे. यासाठीच मंगाईकडे शरण जाऊन पाऊस पडू दे, उदंड पीक पाणी होउदे, लोकांच्या पोटापाण्याची चिंता मिटू दे, नद्या भरू दे, जनावरांना चारा होउदे अशा पद्धतीची मागणी मंगाईकडे करण्यात आली. शेतकरी हा सृजनतेचे प्रतीक आहे. याच शेतकऱ्याच्या सृजनशीलतेला बळ दे अशा पद्धतीची मागणी काल करण्यात आली.
ज्याज्यावेळी समाजात काही अनिष्ट घडत असते त्यावेळी सामान्य माणूस निर्सगाला, देव-देवतांना शरण जातो आणि आपल्या श्रद्धेने त्यांच्यापुढे नतमस्तक होतो.
जत्रा, यात्रांच्या माध्यमातून अनेकवेळा देवाला साकडे घालण्यात येते. याचप्रमाणे कालदेखील वडगावचे ग्रामदैवत मंगाई देवीच्या यात्रेच्या निमित्ताने शेतकऱ्याने आर्त टाहो फोडत गाऱ्हाणे घातले.