पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ योग्य नुकसान भरपाई देण्याबरोबरच राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी एका वेगळ्या पॅकेजची तरतूद केली जावी, अशी मागणी रयत संघटनेचे बेळगाव तालुका अध्यक्ष राजू मरवे यांनी केली आहे.
शहरात आज गुरुवारी सकाळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना शेतकरी व रयत संघटनेचे नेते राजू मरवे यांनी सर्वप्रथम दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल सिद्धरामय्या यांचे अभिनंदन केले. तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या शेतकऱ्यांना निश्चितपणे न्याय देतील असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले की, बेळगाव परिसरात शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.
यंदा पावसाअभावी शेत पिके वाळून जात असल्यामुळे या शेतकऱ्यांवर अरिष्ट कोसळले आहे. मान्सून प्रदीर्घ लांबल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह भात, रताळी, बटाटे वगैरेंचे उत्पादन घेणारे शेतकरी देखील संकटात सापडले आहेत.
याची गांभीर्याने दखल घेऊन राज्य सरकारच्या सध्या बेंगलोर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात राज्याचा जो अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक वेगळे पॅकेज देऊन त्यांना दिलासा देण्यात यावा असे मत व्यक्त करून पावसाअभावी भात पेरणी अर्धवट उगवल्याने नुकसान झाले आहे.
आता दुबार पेरणीही करावी लागणार असल्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना प्रति एकर किमान 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊस सुकल्यामुळे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना खताचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी सरकारने चांगले पाऊल उचलले पाहिजे, असेही राजू मरवे यांनी स्पष्ट केले.