बेळगाव लाईव्ह : बुडाने कणबर्गी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन ६१ क्रमांक स्कीम राबविण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र, त्या विरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
याप्रकरणी न्यायालयाने स्थगिती दिली असून देखील बुडा पुन्हा संपूर्ण जमिनीमध्येच स्कीम राबविण्याबाबत प्रयत्न करत आहे. त्या विरोधात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात कणबर्गी येथील शेतकऱ्यांनी, न्यायालयाने स्थगिती दिली आहे यामुळे बुडाने एनओसी दिली पाहिजे. मात्र बुडा एनओसी देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान ही योजना राबवत असताना काही जणांनी जमिनी खरेदी केल्या आहेत.

त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. जर योजना राबवायची होती तर त्यामधील काही जणांची बेकायदेशीर खरेदी कशा प्रकारे झाली? असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला आहे.
बुडाने आम्हाला न्यायालयाच्या आदेशानुसार एनओसी द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी बबन मालाई, मुल्ला यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते