Monday, December 23, 2024

/

केंद्र सरकारच्या विरोधात युवा काँग्रेसचे आंदोलन

 belgaum

कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या अन्नभाग्य योजनेसाठी आवश्यक तांदूळ पुरवठ्यात आडकाठी आणून राजकीय द्वेष प्रकट केला जात आहे असा आरोप करत बेळगाव जिल्हा युवा काँग्रेस समितीतर्फे आज सकाळी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन छेडण्याबरोबरच काडा कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले.

कर्नाटक राज्य सरकारच्या गॅरंटी योजनांपैकी एक असलेल्या अन्नभाग्य योजनेसाठी आवश्यक तांदूळ पुरवठा करण्यास भारतीय अन्न महामंडळ पर्यायाने केंद्र सरकारने असमर्थता दर्शविली आहे. याच्या निषेधार्थ बेळगाव जिल्हा युवा काँग्रेसतर्फे आज बुधवारी सकाळी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव आणि कर्नाटकचे मुख्य प्रभारी बंटी शेळके यांच्या नेतृत्वाखाली शहरातील कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन छेडून केंद्र सरकारच्या कृतीचा निषेध करण्यात आला.

यावेळी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आपला असंतोष प्रकट केला. त्यानंतर कर्नाटक कृषी आणि विकास प्राधिकरणाच्या (काडा) कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. तसेच त्या ठिकाणी ठिय्या आंदोलनाद्वारे निषेध व्यक्त करून निवेदन सादर करण्यात आले.

आंदोलनादरम्यान चन्नम्मा सर्कल येथे प्रसिद्धी माध्यमांची बोलताना युवा काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी बंटी शेळके म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार 2014 मध्ये मोठमोठी आश्वासने देऊन देशात सत्तेवर आले. मात्र तत्पूर्वी देशात काँग्रेसचे युपीए सरकार अस्तित्वात असतानाच त्यागमूर्ती सोनिया गांधी आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या माध्यमातून अन्न सुरक्षा विधेयक अस्तित्वात आले होते.Bjp protest

त्यावेळी त्यांनी जनतेला दरडोई 2 किलो तांदूळ आणि 3 किलो गहू मोफत देण्याचे कार्य केले होते. कर्नाटकात आपले 135 आमदारांना निवडून आणून काँग्रेस बहुमतात आहे. परंतु राज्यात भाजपचेही आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे त्यांचेही मतदार आहेत. तांदूळ पुरवठ्यात आडकाठी आणून त्यांच्यावरही अन्याय करण्याचे काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार करत आहे. आज भाजीपाल्यासह जीवनावश्यक साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यासाठी राज्यातील विद्यमान काँग्रेस सरकारने जनहितार्थ अन्नभाग्य योजना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला. मात्र केंद्रातील भाजप सरकार त्यात अडथळा आणत आहे. जनतेच्या ताटातील अन्न हिरावून घेत आहे.

तुम्ही रोजगार देऊ नका पण किमान जनतेवर उपासमारीची पाळी आणू नका अशी आमची विनंती आहे. कर्नाटक सरकारला तांदूळ पुरवठा नाकारणे ही कृती राजकीय व्देषातून केली जात आहे असे सांगून कर्नाटक सरकारच्या अन्नभाग्य योजनेत केंद्राने अडथळा आणू नये, अन्यथा गाठ युवा काँग्रेसशी आहे. राज्यातील काँग्रेस सरकारवर विश्वास ठेवणारी जनताही फार काळ गप बसणार नाही, असा इशारा बंटी शेळके यांनी दिला. तसेच यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली. बेळगाव जिल्हा युवा काँग्रेस समितीच्या आजच्या आंदोलनात बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात काँग्रेसचे चिन्ह असलेले ध्वज घेऊन सहभाग दर्शविला होता. चन्नम्मा सर्कल येथे केलेल्या आंदोलनामुळे तेथील वाहतूक कांही काळ विस्कळीत झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.