हनुमान नगर परिसरातील 25 हून अधिक दुकाने महापालिकेने सोमवारी हटवली. महापालिकेने मोठ्या प्रमाणात ही कारवाई केली. यावेळी पोलिस बंदोबस्तही होता.
हनुमान नगर सर्कल ते गणपती मंदिरपर्यंतचा रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठ्या संख्येने अतिक्रमण झाले होते. वारंवार तक्रारी करूनही महापालिकेने त्याची दखल घेतली नव्हती.
आता महापालिकेचे नूतन आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याकडे तक्रार करताच आरोग्याधिकारी डॉ. संजय डूमगोळ यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. या रस्त्याच्या दोन्ही बाजुला खाद्यपदार्थ विकण्याची दुकाने होती.
त्यामुळे संध्याकाळी परिसरात मोठी गर्दी होते. त्यामुळे रहदारीला अडथळा जाणवत होता. फूटपाथवरच अन्न, फळे, भाजी विक्री करण्यात येत होती. त्यामुळे अनेकांनी महापालिकेकडे तक्रार दिली होती.
अखेर आता त्याची दखल घेऊन आज 25 हून अधिक दुकाने हटवली. सर्व साहित्य जप्त केले. यावेळी वाहतूक पोलिसही कारवाईत सहभागी झाले होते.