बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर चोहोबाजूंनी निसर्गाने नटलेले आहे. बेळगावच्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. मात्र बेळगावचे सौंदर्य झाकोळण्याचे काम अनेकवेळा बॅनरबाजीतून होते आणि यामुळे रस्त्याचा श्वास गुदमरतो. बॅनरबाजीमुळे झाकोळलेल्या रस्त्यांमुळे बेळगावच्या सौंदर्याचे विद्रुपीकरण होते. आणि बहुतांशी नागरिकांना याचा वैतागही येतो. मात्र याविरोधात सर्वसामान्य नागरिक क्वचितच आवाज उठवू शकतो.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात निवडणुकीची धामधूम सुरु होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध नेत्यांनी बेळगावचा दौरा आखला. प्रचारासाठी अनेक कार्यक्रम आयोजिले गेले. आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची मांदियाळी झाली. हायकमांडच्या नेत्यांना खुश करण्यासाठी, उमेदवारीसाठी, पदासाठी यासह अनेक कारणांसाठी राजकारणात प्रवेश करणाऱ्यांनी, इच्छुक उमेदवारांनी, आजी – माजी लोकप्रतिनिधींनी शहरातील रस्त्यांवर बॅनरबाजी सुरु केली.
हि बॅनरबाजी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली कि प्रत्येक चौक, प्रत्येक रस्ता, उंच कमानींवर राजकीय व्यक्तींच्या जाहिराती बॅनर च्या माध्यमातून झळकू लागल्या. मात्र यामुळे बेळगावच्या रस्त्यांचा आणि पर्यायाने नागरिकांचा श्वास गुदमरला होता. मध्यंतरीच्या काळात प्रशासनाने आणि कॅंटोन्मेंट बोर्डाने आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर तसेच विविध कारणास्तव काही ठिकाणचे फलक हटविले. काही ठिकाणच्या बेकायदेशीर फलकांवर कारवाईही केली. मात्र शहरातील मुख्य चौकातील बॅनर काही हटले नाहीत. बॅनरबाजीमुळे बेळगावच्या वातावरणात वेगळ्या पद्धतीचा बदल नागरिकांना जाणवत होता. रस्त्यांवरून ये जा करणारे नागरिक हास्यास्यपदरीत्या, मिष्किलरीत्या आणि कित्येकवेळा संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत होते.
आता निवडणुकीची धामधूम शांत झाली असून बॅनरबाजीला काहीशी विश्रांती मिळाली आहे. राज्यात नवे सरकार सत्तारूढ झाले. आणि हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली. धर्मवीर संभाजी चौकात गेल्या १ – १.५ महिन्यापूर्वी सर्वच बॅनर हटविण्यात आले. या कारवाईमुळे धर्मवीर संभाजी चौकाचे खरे सौंदर्य नागरिकांना न्याहाळता आले. शहरातील प्रमुख चौकांपैकी एक असणाऱ्या राणी कित्तूर चन्नम्मा चौकात अद्यापही काही बॅनर झळकत आहेत. सरकारी योजनांची माहिती देणारे तसेच संस्था-संघटनांचे बॅनर वगळता राजकीय व्यक्तींचे बॅनर आता काहीसे हटले आहेत.
रस्त्यांवरील, चौकाचौकात बॅनरबाजीला काहीशी विश्रांती मिळाली असून आता रस्त्यावरून मार्गस्थ होणाऱ्या बेळगावकरांना बेळगाव शहरात फिरताना वेगळाच अनुभव येत आहे. राजकीय बॅनरबाजीपासून मोकळा श्वास घेतलेल्या रस्त्यांमुळे नागरिकातूनही समाधान व्यक्त होत आहे.