शालेय विद्यार्थ्यांमधील मोबाईलचा वाढता वापर त्यांच्या आरोग्यावर परिणाम करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मुलांमधील मोबाईल वापराची सवय वेळीच सोडवण्याची गरज राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
कोरोना प्रादुर्भाव काळात ऑनलाइन शैक्षणिक वर्ग घेण्यात आले. परिणामी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील मुलांच्या हाती मोबाईल आले. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन आता शाळांमधील वर्ग पूर्ववत सुरू झाले असले तरी मुले अद्याप मोबाईल वापराच्या सवयीतून बाहेर पडलेली नाहीत. मोबाईलचा सतत वापर मानसिक स्थितीवर प्रभाव करू शकतो.
त्यामुळे राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने चिंता व्यक्त केली आहे. तसेच आयोगाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याबाबत पालकांमध्ये जागृती करणे जरुरी असल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांकडून होणारा मोबाईलचा वाढता वापर लक्षात घेऊन शाळांमध्ये वैद्यकीय तपासणी घेण्याबाबत विनंती केली आहे.
मोबाईलद्वारे शिक्षणाशी संबंधित चांगली माहिती मिळते. परंतु त्याचा गैरवापर टाळणे जरुरीचे आहे. ऑनलाईनमुळे मानसिक व लैंगिक शोषणाबाबत तक्रारी वाढल्या आहेत. सायबर गुन्ह्यातही वाढ होण्याची भीती आहे.
स्मार्टफोन अतिवापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांवर ताण, मान आणि पाठ दुखी, निद्रानाश यासारख्या समस्या निर्माण होतात. त्याशिवाय शारीरिक हालचालींची गती मंदावते. यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईल फोनबाबत मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून सांगण्यात आले आहे.