Thursday, January 2, 2025

/

चार्टर्ड अकाउंटंट दिनविशेष : ‘चार्टर्ड अकाउंटंट्स’चे कुटुंब!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : शिक्षण एका कुटुंबाचा किती विकास करू शकतं, शिक्षण एका कुटुंबासाठी किती महत्वाचं ठरू शकतं याचं उदाहरण म्हणजे बेळगावमधील हरगुडे कुटुंब! कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील तुडीये गावातील हरगुडे कुटुंबातील आतापर्यंत तिसरी पिढी ‘चार्टर्ड अकाउंटंट’ म्हणून काम करत आहे. कुटुंबातील सात सदस्य आणि त्यांचे नातेवाईक असे एकूण नऊ चार्टर्ड अकाउंटंट हरगुडे कुटुंबातील सध्या कार्यरत आहेत. हरगुडे कुटुंबाकडे चार्टर्ड अकाउंटंटचेच कुटुंब म्हणून पाहिले जाते. एखाद्या व्यवसायाकडे किंवा एका सेवेकडे एखादे कुटुंब कशापद्धतीने पाहते याचे हरगुडे कुटुंबीय हे उत्तम उदाहरण आहेत. १ जुलै हा चार्टर्ड अकाउंटंट दिवस म्हणून साजरा केला जातो. या विशेष दिनाचे औचित्य साधून ‘बेळगाव लाईव्ह’ च्या माध्यमातून हरगुडे कुटुंबियांच्या माध्यमातून चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच सनदी लेखापाल क्षेत्राचा घेतलेला आढावा…

चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच सी.ए. हा अभ्यासक्रम म्हणावा तितका सोपा नसतो. देशात चार्टर्ड अकाउंटंट्सची संख्या खूप कमी आहे. चार्टर्ड अकाउंटंट होणं तितकं सोपं नसत. जर कोणत्या क्षेत्रात निकाल कमी लागत असेल तर तो याच क्षेत्रातील लागतो. अतिशय कमी टक्केवारी असणाऱ्या या क्षेत्रात चार्टर्ड अकाउंटंट होणं हि साधी बाब नसते. मात्र हरगुडे कुटुंबीयांनी या क्षेत्रात शैक्षणिक क्रांती करत तब्बल ९ चार्टर्ड अकाउंटंट या क्षेत्रात उतरवले आहेत. एकाच कुटुंबातील एकाच पद्धतीचे शिक्षण घेत ९ जण या व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असून आज बेळगावमधील नामांकित चार्टर्ड अकाउंटंट्स मध्ये या कुटुंबियांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

एखादी कंपनी किंवा व्यापारी यांच्या आर्थिक व्यवहारांचा हिशोब, आर्थिक कायद्यानुसार सल्ला देणे, करांचे मूल्यमापन करणे आणि कर भरणे, आर्थिक नोंदी, ऑडिट करणे, कर आकारणी, आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थापनासह वित्तीय संबंधित सर्व कामे करणे अशी चार्टर्ड अकाउंटंटची जबाबदारी असते. वैद्यकीय क्षेत्रात काम करायचे असल्यास या क्षेत्राचे शिक्षण घेण्यासाठी अमाप पैसा खर्च करावा लागतो. मात्र चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी बुद्धी हेच एकमेव भांडवल महत्वाचे ठरते.Hargude ca

संपूर्ण देशात या क्षेत्राचा निकाल सरासरी चार ते पाच टक्के इतकाच लागतो. अशा या क्षेत्रात जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तसेच सीए. रामलिंग हरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हरगुडे कुटुंबातील एकूण सात सदस्य या क्षेत्रात यशस्वी ठरले आहेत. ७४ वर्षांचे रामलिंग हरगुडे यांनी आपल्या कुटुंबातील आपल्यासह ७ सदस्यांना या क्षेत्राविषयी मार्गदर्शन केले. बेळगावमधील समिती महाविद्यालय आणि ज्योती महाविद्यालय यासह गडहिंग्लज शिवराज आणि गोवा म्हापसा गोवा कॉलेज येथे त्यांनी प्राचार्य म्हणून देखील काम पाहिले आहे. आजवर त्यांनी २० चार्टर्ड अकाउंटंट्ससह आयपीओ ,इन्कम टॅक्स आणि सेल्स टॅक्स अधिकारी बनविण्यासाठी संपूर्ण प्रशिक्षण दिले असून बिकट परिस्थितीतून वाट काढत आज बेळगावमध्ये चार्टर्ड अकाउंटंट क्षेत्रात नाव कमाविले आहे. मूळचे तुडये गावातील हरगुडे कुटुंब आता बेळगाव शहरात कार्यरत आहे. रामलिंग हरगुडे यांच्यासह त्यांचे बंधू पांडुरंग हरगुडे आणि पुतण्या नितीन हरगुडे यांनीही कोल्हापूरमध्ये जनाई कोचिंग अकादमी अंतर्गत आजवर ५० ते ६० जणांना प्रशिक्षण देऊन चार्टर्ड अकाउंटंट बनविले आहे.

या कुटुंबातील रामलिंग हरगुडे यांच्यासह पी एन हरगुडे, सनील हरगुडे, नितीन हरगुडे, ज्योती हरगुडे हराळे , शुभम हरगुडे, प्रज्ञा हरगुडे हे सात सदस्य चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत. तर या कुटुंबाशी जावई या नात्याने जोडले गेलेले नंदकुमार शेळके आणि अक्षय हराळे हेदेखील या क्षेत्रात कार्यरत आहेत.

हरगुडे कुटुंबातील एकूण ९ सदस्य सध्या बेळगावसह गडहिंग्लज, कोल्हापूर याठिकाणीदेखील या क्षेत्रात उत्तमपणे कार्यरत आहेत. कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवरील तुडये या गावातील हरगुडे कुटुंबियांकडून या क्षेत्रात होत असलेली कामगिरी बेळगावसाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे.टीम बेळगाव live कडून जागतिक चार्टर्ड अकाउंटंट दिनी सर्व सी ए हरगुडेना शुभेच्छा!

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.