शहरातील घन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरता नवा प्रकल्प उभारण्यासाठी बेळगाव महापालिकेकडून 20 ते 25 एकर जमीन खरेदी किंवा भाडे कराराने घेतली जाणार आहे. तरी शहरात किंवा लगत स्वतःच्या मालकीची 20 -25 एकर जमीन असलेल्या इच्छुकांनी संपर्क साधावा. कचरा प्रकल्पासाठी ती जागा महापालिका योग्य दराने खरेदी किंवा भाडेकरारने घेईल, असे आवाहन महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी केले आहे.
बेळगाव महापालिकेच्या गेल्या 7 जून रोजी झालेल्या आढावा बैठकीत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घनकचरा प्रकल्पावर गांभीर्याने चर्चा केली होती. शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी चार नवे प्रकल्प सुरू करण्याची सूचना दोघांनी केली होती. त्यानुसार महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे तथापि एवढी मोठी जागा मिळणार का? हा प्रश्न आहे. शहरात दररोज तयार होणाऱ्या सुमारे 250 टन कचऱ्यावर घनकचरा निर्मूलन कायदा 2002 नुसार सध्या तुरमुरी प्रकल्पामध्ये प्रक्रिया केली जात आहे. भविष्यात शहरातील कचऱ्याचे प्रमाण 300 ते 400 टनापर्यंत जाऊ शकते असा महापालिकेचा अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवर आता 2016 च्या घनकचरा निर्मूलन कायदानुसार नवा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे तुरमुरी कचरा डेपो वरील ताण तर कमी होणारच आहे, शिवाय भविष्यात हा प्रकल्प बंद देखील होऊ शकतो. तुरमुरी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प राबविण्यासाठी रामकी एन्व्हीरो कंपनी आणि महापालिका यांच्यात 20 वर्षाचा करार झाला आहे.
त्या करारानुसार महापालिकेकडून कंपनीला दररोज 250 टन कचरा पुरवण्याबरोबरच प्रक्रियेचे शुल्कही अदा केले जाते. महापालिका आणि रामकी कंपनी यांच्यातील करार 2027 मध्ये संपुष्टात येणार असल्यामुळे त्याआधी महापालिकेकडून नवा कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला जाणार आहे.
या संदर्भातील आराखडा महापालिकेच्या पुढील आढावा बैठकीत सादर करण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.