बेळगाव जिल्ह्यातील मुडलगीचे मंडल पोलीस निरीक्षक (सीपीआय) श्रीशैल बॅकोड यांनी कझाकिस्तान येथे आयोजित आयर्न मॅन या जगप्रसिद्ध ट्रायथलाॅन शर्यतीमध्ये सुयश मिळवत “आयर्न मॅन” हा मानाचा किताब पटकावला आहे.
सदर सलग 3.8 कि.मी. जलतरण, 180 कि.मी. सायकलींग आणि 42 कि.मी. धावणे अशा स्वरूपाची ही शर्यत त्यांनी 14 तास 30 मिनिटात यशस्वीरीत्या पूर्ण केली.
कर्नाटक पोलीस दलाच्या इतिहासातील श्रीशैल बॅकोड हे पहिले पोलीस अधिकारी आहेत ज्यांनी या पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारात भाग घेऊन सुयश मिळविले आहे. त्यांचे अभिनंदन केल्यानंतर कझाकिस्तान येथे बॅकोड यांनी मिळविलेले सुयश आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांनी काढले.
कझाकिस्तान येथे नुकत्याच झालेल्या आयर्न मॅन शर्यतीमध्ये जगभरातील 64 देशांमधील 2400 स्पर्धकांनी भाग घेतला होता. या शर्यतीचा आनंद लुटण्यासाठी भारतासह चीन, ग्रेट ब्रिटन, जर्मनी, पोलंड, स्वित्झर्लंड, इटली, युक्रेन आणि अमेरिकेच्या क्रीडा पर्यटकांनी कझाकिस्तान येथे हजेरी लावली होती. जगातील सर्वात खडतर शर्यत मानल्या जाणाऱ्या आयर्न मॅन शर्यतीमध्ये स्पर्धकांना 3.86 कि.मी. जलतरण, 180.25 कि.मी. सायकलींग आणि 42.195 कि.मी. धावणे हे क्रीडा प्रकार सलग पूर्ण करावे लागतात. सीपीआय श्रीशैल बॅकोड यांनी गेल्या ऑक्टोबर 2022 मध्ये कोल्हापूर महाराष्ट्र येथे आयोजित हाफ आयर्न मॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली होती.
कझाकिस्तान येथील आयर्न मॅन स्पर्धेस पात्र ठरण्यासाठी किमान हाफ आयर्न मॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक असते, जी मी गेल्या वर्षी कोल्हापूर येथे पूर्ण केली होती. कोल्हापूर येथील शर्यती मधील माझी कामगिरी लक्षात घेऊन कझाकिस्तानच्या स्पर्धा आयोजकांनी मला त्यांच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी निमंत्रण दिले, अशी माहिती सीपीआय श्रीशैल बॅकोड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गेल्या 2014 मध्ये माझे वजन 102 किलो होते, जे मी 2019 पर्यंत 96 किलो इतके कमी केले आणि पुढे 2020 पासून आजतागायत मी स्थीर 75 किलोचा आहे. हा कोणताही चमत्कार नसून आरोग्यपूर्ण सरावाद्वारे मी ते करू शकलो असे स्पष्ट करून दर्जेदार जीवन जगण्यासाठी आपल्या आरोग्यावर आणि शारीरिक तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करा असे आवाहन त्यांनी आपल्या सहकारी पोलीस अधिकाऱ्यांसह समस्त पोलीस कर्मचाऱ्यांना केले आहे.
गेल्या 2019 मध्ये कर्तव्यदक्ष निष्ठावंत सेवेबद्दल मुख्यमंत्री पदकाने सन्मानित झालेले सीपीआय श्रीशैल बॅकोड आरोग्य आणि तंदुरुस्तीच्या महत्त्वाबद्दल सातत्याने जनजागृती करत असतात.