पावसाने बेळगाव जिल्ह्याला अद्यापही म्हणावा तसा दिलासा दिलेला नाही. गेला जून महिना जवळपास कोरडा गेल्यानंतर आता जुलैच्या गेल्या 13 दिवसात पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली असली तरी त्याचे प्रमाण खूपच कमी आहे.
सदर कालावधीत जिल्ह्यात सर्वाधिक 202.9 मि.मी. पावसाची नोंद खानापूर येथे झाली असून सर्वाधिक कमी 8.2 मि.मी. पाऊस गोकाक मध्ये नोंदवला गेला आहे.
बेळगाव शहर परिसरात जुलै महिन्यात सर्वसामान्यपणे सरासरी 455 मि.मी. पावसाची नोंद होते. मात्र आत्तापर्यंत गेल्या 13 दिवसात बेळगाव सरकारी विश्रामधामाच्या (आयबी) ठिकाणी असलेल्या पर्जन्य मापन उपकरणांमध्ये अवघ्या 78.6 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.
खानापूरच्या बाबतीतही हीच परिस्थिती असून खानापूरमध्ये जुलै महिन्यात सर्वसामान्यपणे सरासरी 756 मि.मी. पाऊस पडतो. परंतु आता अर्धा महिना उलटत आला तरी या ठिकाणी 202.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
अथणी, गोकाक आणि बैलहोंगल येथे तर गेल्या चार दिवसांपासून पावसाचा पत्ताच नाही. या ठिकाणच्या पर्जन्यमापन केंद्रांमध्ये गेल्या 9 जुलैपासून पावसाची नोंद ‘शून्य’ आहे. एकंदर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पावसाची निराशाजनक हजेरी पहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी सर्वसामान्यपणे जुलै महिन्यात होणारा पाऊस आणि 1 ते 13 जुलै 2023 या कालावधीत झालेल्या एकूण पाऊस खालील प्रमाणे आहे.
अथणी एचबीसी : सर्वसामान्य पाऊस 65 मि.मी., झालेला एकूण पाऊस 16.6 मि.मी.. बैलहोंगल आयबी : 129 मि.मी., 26.0 मि.मी.. बेळगाव आयबी : 455 मि.मी., 78.6 मि.मी.. चिक्कोडी : 134 मि.मी., 43.5 मि.मी.. गोकाक : 68 मि.मी., 8.2 मि.मी..
हुक्केरी एसएफ : 150 मि.मी., 29.7 मि.मी.. कागवाड (शेडबाळ) : 68.5 मि.मी., 20.6 मि.मी.. खानापूर : 756 मि.मी., 202.9 मि.मी.. कित्तूर : 270 मि.मी., 47.4 मि.मी.. मुडलगी : 67 मि.मी., 41.0 मि.मी.. निप्पाणी आयबी : 201.8 मि.मी., 60.4 मि.मी.. रायबाग : 74 मि.मी., 22.1 मि.मी.. रामदुर्ग : 64 मि.मी., 16.7 मि.मी.. सौंदत्ती : 76 मि.मी., 26.0 मि.मी..