पूर्वीचा जुना राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 -ए आणि सध्याचा बेळगाव -पणजी महामार्ग क्र. 749 च्या बेळगाव -खानापूर विभागातील गणेबैल टोल प्लाझाच्या अर्थात टोल नाक्याच्या ठिकाणी येत्या मंगळवार दि. 11 जुलै रोजी सकाळी 8 वाजल्यापासून टोल वसुलीला प्रारंभ होणार आहे. तशी अधीसूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नुकतीच जाहीर केली आहे.
गणेबैल टोल प्लाझावर टोल वसुली सुरू होणार असली तरी या ठिकाणच्या 20 कि.मी. परिसरातील बिगर वाणिज्य वाहनानकरिता दरमहा 330 रुपयांचा पास उपलब्ध केला जाणार आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्य वतीने बेळगाव -खानापूर या 30 कि.मी. लांबीच्या रस्त्याचे विकास काम सुरू झाले आहे. तथापि यापैकी केवळ 16.345 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीस खुला झाला आहे. त्यामुळे टोल वसुलीचा दर या अंतराच्या मार्गापुरता निश्चित केला आहे. गणेबैल नजीक टोल वसुली प्लाझाचे काम बऱ्याच दिवसांपूर्वी पूर्ण झाले असले तरी आता 11 जुलैपासून या ठिकाणी प्रत्यक्ष टोल वसुली सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. टोलनाक्याच्या ठिकाणी आकारले जाणारे दर हे येत्या 31 मार्च 2024 पर्यंत लागू असतील
या टोल प्लाझाच्या ठिकाणी सर्व वाहनांसाठी 24 तासात परतीचा प्रवास केल्यास 25 टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच एका महिन्यात 50 वेळा प्रवास केल्यास टोलमध्ये 30 टक्के सूट असेल. टोल प्लाझा असलेल्या जिल्ह्यातील नोंदणीकृत वाणिज्य वाहनांना राष्ट्रीय परवाना वगळता 50 टक्के सूट आहे.
परवानगीपेक्षा अधिक वजनाची वाहतूक केल्यास टोल शुल्काच्या दहापट अधिक दराने वसुली होणार आहे. सदर महामार्ग प्रकल्पाचा खर्च 114.40 कोटी इतका आला असून हा खर्च भरून निघण्यासाठी 40 टक्के टोल दर कमी करण्यात येणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
गणेबैल टोल प्लाझाच्या परिसरातील वाहनधारकांना टोल मधून वगळले जावे अशी मागणी होती. त्या मागणी ऐवजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्थानिक नागरिकांना मासिक पासचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार टोल प्लाझाच्या 20 कि.मी. परिघात असलेल्या बिगर वाणिज्य वाहनांना 2023 -24 सालासाठी मासिक 330 रुपयाचा पास देण्यात येणार आहे.
गणेबैल टोल प्लाझा वरील निर्धारित दर पुढील प्रमाणे आहेत. कार, जीप, व्हॅन, लाईट मोटर व्हेईकल यांच्या एकेरी वाहतुकीसाठी 30 रु. दुहेरी वाहतुकीसाठी 45 रु., मासिक 50 हून अधिक फेऱ्यांसाठी 950 रु., जिल्हा नोंदणी असलेल्या वाहनासाठी 15 रु. मिनी बस, लहान मालवाहू वाहन यांच्या एकेरी वाहतुकीसाठी 45 रु., दुहेरी वाहतुकीसाठी 70 रु., मासिक 50 हून अधिक फेऱ्यांसाठी 1530 रु., जिल्हा नोंदणी असलेल्या वाहनासाठी 25 रु. बस, ट्रक (2 एक्सेल) यांच्या एकेरी वाहतुकीसाठी 95 रु., दुहेरी वाहतुकीसाठी 140 रु., मासिक 50 हून अधिक फेऱ्यांसाठी 3145 रु., जिल्हा नोंदणी असलेल्या वाहनासाठी 45 रु. मालवाहू वाहन (3 एक्सेल) यांच्या एकेरी वाहतुकीसाठी 105 रु., दुहेरी वाहतुकीसाठी 160 रु., मासिक 50 हून अधिक फेऱ्यांसाठी 3500 रु., जिल्हा नोंदणी असलेल्या वाहनासाठी 55 रु. अवजड बांधकाम मशीन वाहन, अर्थ मुव्हिंग, मल्टी एक्सल (4 ते 6 एक्सेल) यांच्या एकेरी वाहतुकीसाठी 150 रु., दुहेरी वाहतुकीसाठी 225 रु., मासिक 50 हून अधिक फेऱ्यांसाठी 5035 रु., जिल्हा नोंदणी असलेल्या वाहनासाठी 75 रु. 7 हून अधिक एक्सेल वाहनांच्या एकेरी वाहतुकीसाठी 185 रु., दुहेरी वाहतुकीसाठी 275 रु., मासिक 50 हून अधिक फेऱ्यांसाठी 6125 रु., जिल्हा नोंदणी असलेल्या वाहनासाठी 90 रुपये. दरम्यान, अशोका कंपनीकडे टोल वसुलीचे कंत्राट आहे.
नियमानुसार एका टोलनाक्यापासून दुसऱ्या टोल नाक्यापर्यंतचा रस्ता व्यवस्थित सुस्थितीत असेल तर टोल आकारण्याची परवानगी असते. मात्र बेळगाव -पणजी महामार्ग क्र. 749 वरील परिस्थिती उलट आहे. या ठिकाणी गणेबैल टोलनाक्यापासून रामनगर टोलनाक्यापर्यंतचा रस्ता अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे. ही वस्तुस्थिती असताना गणेबैल टोल प्लाझाच्या ठिकाणी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे त्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.