लष्करात सहभागी होण्याचे बालपणापासून पाहिलेले स्वप्न आणि त्यासाठी आपले ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने शिक्षण आणि प्रशिक्षण घेऊन ते लष्करात दाखल झाले. शत्रूंचा बिमोड करून देशाचे रक्षण करणे या एकाच क्रियेने प्रेरित झालेल्या त्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता कारगिल युद्धामध्ये अतुलनीय कामगिरी बजावली. त्यांचे धाडस आणि पराक्रम आजही युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे आणि ते आहेत बेळगाव जिल्ह्यातील इंचल गावचे सुपुत्र ब्रिगेडियर यल्लनगौडा.
इंचल (ता. बैलहोंगल, जि. बेळगाव) सारख्या एका छोट्या गावात जन्मलेल्या आणि तेथेच आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या यल्लनगौडा यांच्या हृदयात लहानपणापासून मोठी स्वप्न होती. लष्करात देशसेवा सेवा बजावणाऱ्या गावातील कांही गावकऱ्यांपासून प्रेरणा घेऊन त्यांनी भविष्यात मोठा लष्करी अधिकारी बनण्याचा निश्चय केला. या निर्धारसह त्यांनी आपले देशसेवेचे एकमेव लक्ष्य गाठण्यासाठी विजापूर सैनिक स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. तेंव्हा त्यांना कल्पनाही नव्हती की नशिबाने त्यांच्यासाठी मोठी योजना आखली आहे.
कारण गेल्या सप्टेंबर 1999 मध्ये वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी ते कारगिलच्या रणांगणात होते. तडफदार युवा अधिकारी असलेल्या यल्लनगौडा यांनी त्यावेळी जम्मू आणि काश्मीर येथे मोठ्या शौर्याने अतिरेक्यांविरुद्ध लढा दिला. पुढे त्यांनी अतिरेक्यांविरुद्धच्या अनेक मोहिमांमध्ये आघाडीवर राहून बऱ्याच विदेशी अतिरेक्यांना यमसदनी धाडले.
अतिरेक्यांविरुद्धच्या एका चकमकीप्रसंगी धुवाधार गोळीबार सुरू असताना त्यांनी अचाट साहस दाखवत दोघा अतिरेक्यांना ठार मारून शत्रूंच्या गोळीबारात सापडलेल्या आपल्या दोन सहकारी जवानांचा जीवही वाचविला. मात्र या वीरतेसाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागली. त्यावेळी गोळी लागून ते गंभीर जखमी झाले होते. मात्र तशा अवस्थेत प्रचंड वेदना सहन करत त्यांनी जंगलातून तब्बल 3 तास चालत जाऊन हॉस्पिटल गाठले आणि मृत्यूवर मात केली. दैव बलवत्तर म्हणून एके 47 रायफलची गोळी हृदयापासून अवघ्या इंचावर छातीत घुसल्यामुळे देवाच्या आशीर्वादाने चमत्कारिकरित्या यल्लनगौडा यांचा जीव वाचला. त्यानंतर चार महिने हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बऱ्या झालेल्या यल्लनगौडा यांना देशसेवा गप्प बसू देईना. त्यामुळे ते पुन्हा आपल्या बटालियनमध्ये रुजू झाले. त्यांच्या अतुलनीय पराक्रमाबद्दल त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यपदक देऊन गौरविण्यात आले.
यल्लनगौडा यांचा 15 मे 2002 रोजी उमा यांच्याशी विवाह झाला आणि त्यानंतर दोनच दिवसात म्हणजे 17 मे 2002 रोजी त्यांना ऑपरेशन पराक्रम या मोहिमेसाठी लष्कराने त्यांना पुन्हा बोलावून घेतले. त्यावेळी ते गंभीर जखमी असूनही त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून सेंट झेवियर्स हायस्कूलच्या विद्यार्थिनी असलेल्या उमा या आपल्या पतीच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल्या. आज देखील त्या आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहून देश सेवेसाठी त्यांना प्रेरणा देत असतात. ऑपरेशन विजय मोहिमेदरम्यान गाजवलेल्या शौर्याचे स्मरण म्हणून यल्लनगौडा पती-पत्नींनी आपल्या मुलाचे नाव ‘विजय’ असे ठेवले आहे. त्यांच्या सुखी-आनंदी वैवाहिक जीवनाला आता 20 वर्षे झाली आहेत. त्याचप्रमाणे लहान वयात निर्धार केल्याप्रमाणे यल्लनगौडा हे आज ब्रिगेडियर या लष्करातील उच्च पदावर कार्यरत राहून देशसेवा बजावत आहेत.
आज भारताच्या कारगिल विजयाचा 24वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने ब्रिगेडियर यल्लनगौडा हे इंचल गावासह बेळगाव जिल्ह्यातील युवा पिढीसाठी एक प्रेरणा -आदर्श ठरत आहेत असे म्हंटल्यास वावगे ठरू नये. कारगिल विजय दिनानिमित्त ब्रिगेडियर जनरल यल्लनगौडा यांच्याप्रमाणेच देशसेवेला वाहून घेतलेल्या आणि आपले बलिदान दिलेल्या जवानांसह त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांना आमचा मानाचा मुजरा.