मागील वर्षी अतिवृष्टीमुळे बळ्ळारी नाल्याला पुर येऊन ओला दुष्काळ निर्माण झाला होता. आता यंदा पावसाने आणखी उशीर केल्यास, सलग मुसळधार हजेरी न लावल्यास शहर परिसरासह जिल्ह्यावर सुक्या दुष्काळाचे संकट ओढवणार असल्याचा धोका रयत संघटनेचे नेते राजू मरवे यांच्यासह जाणकारांनी वर्तविला आहे.
बेळगाव शहरातून वाहणाऱ्या बळ्ळारी नाल्याच्या बाबतीतील सरकार आणि प्रशासनाच्या उदासीन निष्क्रिय धोरणामुळे मागील वर्षी पूर परिस्थिती निर्माण होऊन शहरालगतची सर्व शिवारे पाण्याखाली गेली होती. उभी पिक पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले होते. त्यावेळी ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
अतिवृष्टीमुळे हे संकट ओढवले होते. तथापि तेंव्हा मुबलक पाऊस पडल्यामुळे खरीप हंगाम नुकसानीत गेला असला तरी शेतकऱ्यांना पुढील रब्बी हंगाम चांगल्या प्रकारे साधता आला होता. याखेरीज त्यावेळी खरीप हंगामातील कांही पिके वाचल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना दिलासाही मिळाला होता.
यंदा मात्र पावसाने जणू दडीच मारली आहे. सद्य परिस्थितीत अल्पावधीत शहर परिसरासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली नाही तर बळीराजावर मागील वर्षापेक्षा मोठे अरिष्ट कोसळणार आहे. कारण अद्यापही मान्सूनने आपले खरे स्वरूप दाखवले नसल्यामुळे, थोडक्यात जसा हवा तसा पाऊस अजूनही न झाल्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप पिके तर धोक्यात आलीच आहेत, किंबहुना बऱ्याच पिकांचे नुकसानही झाले आहे.
सदर पिकांसाठी केलेला खर्च पाण्यात गेल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अजूनही दरवर्षीप्रमाणे चांगला पाऊस झाल्यास उर्वरित थोडीफार पिके वाचून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, अन्यथा परिस्थिती कठीण होणार आहे. येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस पडला नाही तर खरीपा मागोमाग यंदाचा रब्बी हंगाम देखील पावसा अभावी मातीमोल होणार असल्यामुळे समस्त शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत.
मात्र हवामानाची एकंदर परिस्थिती पाहता सध्या दमदार पावसाची शक्यता कमीच आहे. त्यामुळे मागील वेळी ज्याप्रमाणे ओला दुष्काळ निर्माण झाला होता. त्याप्रमाणे कृषी क्षेत्राच्या दृष्टीने यंदा शहर परिसरासह जिल्ह्यात सुक्या दुष्काळाची परिस्थिती उद्भवण्याचा धोका रयत संघटनेचे बेळगाव तालुका अध्यक्ष राजू मरवे यांच्यासह अन्य जाणकार ज्येष्ठ शेतकऱ्यांनी वर्तविला आहे.