शेत जमिनीचा वाद न्यायप्रविष्ठ असताना देखील तलवारी, विळे, लाठ्याकाठ्यांनी बेकिनकेरे (ता. जि. बेळगाव) येथे शेतात पेरणी करणाऱ्या शेतकरी कुटुंबावर प्राणघात हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ गजाआड करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
तसेच पीडित शेतकरी कुटुंब आणि त्यांच्या शेत जमिनीला संरक्षण द्यावे, अशी मागणी संबंधित शेतकरी कुटुंबासह समस्त बेकिनकेरेवासियांतर्फे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि राज्याच्या गृहमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
भाजप बेळगाव ग्रामीण मंडळचे धनंजय जाधव, रयत संघटनेचे नेते प्रकाश नायक आदींच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
बेकिनकेरे बेकिनकेरे (ता. जि. बेळगाव) येथे गेल्या गुरुवारी सुमारे 50 -60 जणांच्या गुंडांच्या टोळीने तलवारी, विळे, दगड लाठ्या-काठ्या घेऊन शेतात भात पेरणी करणाऱ्या सावंत कुटुंबीयांवर हल्ला केला. या हल्ल्यात पुंडलिक नागो सावंत (वय 47), राजू नागो सावंत (वय 42), ज्योतिबा नागो सावंत (वय 45), अभिषेक पुंडलिक सावंत (वय 24), सुनिता पुंडलिक सावंत (वय 42), कविता राजू सावंत (वय 40), वनिता ज्योतिबा सावंत (वय 40), कार्तिक राजू सावंत (वय 15), श्रीराज सावंत (वय 12) आणि विघ्नेश्वर सावंत (वय 12, सर्व रा. बेकिनकेरे) हे जखमी झाले होते.
बेकिनकेरे येथील सर्व्हे नं. 85/1 85/2 मधील 9 एकर 30 गुंठे जमिनीवर सावंत कुटुंबीयांचा ताबा आहे. मात्र दुसरा गट देखील या जमिनीवर मालकी हक्क सांगत असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून हा जमिनीचा वाद न्यायप्रविष्ठ आहे. असे असताना सदर जमीन जबरदस्तीने बळकावण्यासाठी सावंत कुटुंबीयांवर गेल्या गुरुवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला.
हाणामारी करून न थांबता त्या गुंडांनी दोन ट्रॅक्टरद्वारे पेरलेल्या भातावर नांगर फिरवून ते उध्वस्त केले. यासंदर्भात काकती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असता पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भादवि कलम 307 अन्वये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्याऐवजी अन्य कलमे लावली आहेत. याखेरीज पोलिसांकडून या प्रकाराची योग्य प्रकारे सखोल चौकशी केली जात नाही आहे. अद्यापपर्यंत त्यांनी दोषींपैकी एकालाही अटक केलेली नाही. तरी आपण या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन हल्लेखोरांना तात्काळ गजाआड करून त्यांच्यावर कठोर कारवाई होईल अशी व्यवस्था करावी. तसेच पीडित सावंत कुटुंबीयांना तसेच त्यांच्या शेतजमिनीला संरक्षण द्यावे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना भाजप बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले की, शेतजमिनीचा वाद न्यायालयात सुरू असताना ग्रामीण भागातील स्थानिक गुंड आणि बाहेरचे काही गुंड असे 50 जणांचे टोळके हातात तलवारी चाकू सारख्या प्राणघातक शस्त्रांसह शेतात जाऊन पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला करते. मात्र दुर्दैवाने पोलीस प्रशासन त्याकडे डोळेझाक करत आहे. आता तक्रार करून चार-पाच दिवस झाले तरी पोलिसांनी कोणालाच अटक केलेली नाही. याप्रकरणी मी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. मात्र त्यांनीही कोणतीच कार्यवाही केलेली नाही. माझा स्पष्ट आरोप आहे की या प्रकरणामागे सध्याचे बेळगाव ग्रामीणचे आमदार आणि मंत्र्यांचा हात असून हल्लेखोरांना त्यांचे संरक्षण मिळत आहे. पोलीस अधिकाऱ्यांना व्यवस्थित मॅनेज करण्यात आले आहे. या पद्धतीने शेतकऱ्यांच्या माना मुरगळण्याचा, त्यांना तुडवण्याचा प्रकार केला जात आहे आणि याचा आम्ही तीव्र निषेध करतो असे सांगून पोलिसांनी हल्लेखोरांना तात्काळ गजाआड करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना संघटित करून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जाधव यांनी दिला.
रयत संघाचे नेते प्रकाश नायक यांनी या प्रकरणात प्रशासनाचे अपयश दिसून येते. जमिनीचा वाद न्यायप्रविष्ठ असताना जबरदस्तीने शेतजमिनीचा ताबा घेणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. यापूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत असेच केल्यामुळे त्यांना घरी बसावे लागले आहे. आता या नव्या सरकारने त्यांची री ओढण्यास सुरुवात केली आहे. तथापि कर्नाटक राज्य रयत संघ हे सहन करणार नाही. जसा मरणहोळमध्ये आम्ही लढा दिला तसाच लढा येथेही देण्यास आम्ही सज्ज आहोत. बेकिनकेरे येथील गुंडगिरीची घटना सरकारच्या हलगर्जीपणामुळे घडली आहे. तेंव्हा सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन त्वरित आवश्यक क्रम घ्यावेत, असे नायक म्हणाले.
बेळगाव ग्रामीण भागातील शेत जमिनी बळकावण्यासाठी हातात प्राणघातक शस्त्रे घेऊन धमकावण्याचे, गुंडगिरी करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. गुंडांच्या दहशतीमुळे शेतात एकटे दुकटे जाण्यास शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय घाबरत आहेत. गुंडानी नुकतेच एका महिला शेतकऱ्याच्या जमिनीतील 50 काजूची झाडे उध्वस्त करून नुकसान केले आहे. उत्तर प्रदेश मध्ये जसे गुंडागिरीचे राज्य होते तसे गुंडाराज बेळगाव तालुक्यात निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेंव्हा जिल्हा प्रशासन आणि पोलीस खात्याने याला वेळीच आळा घातला पाहिजे आणि शेतकऱ्यांना संरक्षण दिले पाहिजे, अशी आम्हा समस्त गावकऱ्यांची कळकळीची विनंती आहे, असे एका गावकऱ्याने प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी बेकिनकेरे गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुंडगिरी मुळे त्रस्त झालेल्या पीडित शेतकरी महिला यावेळी आक्रोश करून आपल्या व्यथा मांडताना दिसत होत्या.