बेळगाव लाईव्ह : बेळगाव मधील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या खानापूर तालुक्यात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. याठिकाणी वर्ष पर्यटनाला पर्यटकांची तुफान गर्दी होते. मात्र गेल्या काही वर्षात याठिकाणी अनेक अनुचित घटना घडत असून काही अतिउत्साही पर्यटकांमुळे दुर्घटना घडण्याचे प्रकार होत आहेत. या कारणास्तव वनविभागाने खबरदारीसाठी या भागातील धबधबे पाहायला जाण्यासाठी बंदी घातली आहे.
गेल्या काही वर्षात या भागात तरुणांची हुल्लडबाजी वाढली आहे. धबधब्याच्या ठिकाणी अतिउत्साहीपणा दाखविणे, मद्यप्राशन करून धिंगाणा घालणे असे प्रकार सर्रास या भागात होऊ लागले असून जीवितहानी होण्याचे प्रकारदेखील वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर रविवार दि. १६ जुलै पासून या भागात पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
पूर्वी वनविभागाकडून जंगलात जाण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र पावसाळ्यातील काही दिवसातच निसर्गसौंदर्य पाहायला मिळते. पर्यावरण प्रेमी आणि ट्रेकर्सना निसर्गसौंदर्य बघता यावे म्हणून बंदीचा नियम शिथिल करण्यात आला होता. वनविभागाने हि बंदी उठवताच तरुणाईने अलीकडच्या काळात या भागातील प्रेक्षणीय स्थळांचा गैरवापर करण्यास सुरुवात केली. धबधबा पाहण्याच्या बहाण्याने अनैतिक कृत्ये होत असल्याचे प्रकारही पुढे आले. यामुळे इतर पर्यटकांसह या भागात राहणाऱ्या नागरिकांनाही याचा मनस्ताप सहन करावा लागत होता. अलीकडे या ठिकाणी अतिउत्साहीपणामुळे आणि सेल्फी घेण्याच्या नादात काही तरुणांना जीव गमावण्याचीही वेळ आली. या पार्श्वभूमीवर वनविभागाने धबधबा पाहायला जाण्यासच बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी खानापूर तालुक्यातील चोर्ला गावाजवळील जंगलात धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा प्रवाहात बुडून मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जंगलात ट्रेकिंग आणि धबधबा पाहण्यावर निर्बंध घालण्याची विनंती केली. या विनंतीला अनुसरून वनविभागाने रविवारपासून धबधबा पाहण्यावर निर्बंध लादले आहेत. बंदी असतानाही धबधबा पाहण्यासाठी जाणाऱ्यांवर वन आणि पोलिस विभाग संयुक्त कारवाई करणार असल्याचे खानापूरचे पीआय मंजुनाथ नायक यांनी सांगितले.
शनिवार आणि रविवार अशा सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येने ट्रेकर्स याठिकाणी भेट देतात. त्यामुळे वनक्षेत्राची शांतता आणि पावित्र्य धोक्यात येते. या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार तालुक्यातील वनक्षेत्राकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर नाकाबंदी करण्यात आली असून पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. बंदीची माहिती देणारे सूचना फलक मुख्य रस्त्यांवर लावण्यात आले आहेत. जनजीवन व वनसंवर्धनाच्या हितासाठी ही कारवाई करण्यात आली असून विभागातील अधिकारी व कर्मचान्यांना जनतेने सहकार्य करावे असे आवाहन झोनल वन अधिकारी कविता एरनट्टी यांनी केले आहे.