बँकेत पैसे भरायला जाणाऱ्या व्यापाऱ्याची अनावधानाने रस्त्यावर पडलेली 2.5 लाख रुपये असलेली बॅग एका ऑटो रिक्षा चालकाने कॅम्प पोलिसांसमक्ष त्या व्यापाऱ्याला सुखरूप परत करून दुर्मिळ प्रामाणिकपणाचे दर्शन घडविल्याची घटना नुकतीच शहरात घडली.
याबाबतची माहिती अशी की, प्लायवूडचे व्यापारी असलेले सुरेश उर्फ अर्जुन जैन गेल्या गेल्या गुरुवारी सकाळी खादरवाडी येथून बँकेत पैसे भरण्यासाठी दुचाकीवरून टिळकवाडी येथे आले होते. त्यांच्या बॅगेत 2 लाख 48 हजार रुपये होते.
टिळकवाडी येथील एका बँकेत कांही पैसे भरून उर्वरित दोन लाख 50 हजार रुपये दुसऱ्या बँकेत भरण्यासाठी कॅम्प परिसरात येत असताना दुचाकीला लावलेली आपली पैशाची बॅग रस्त्यात पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेंव्हा त्यांनी लागलीच कॅम्प पोलिसात धाव घेऊन पैसे हरवल्याची माहिती दिली.
पोलिस लागलीच सीसीटीव्ही फुटेज तपासात पैशाचा बॅगेचा शोध घेत असताना अनंत शंकर होसुरकर या रिक्षाचालकाने एक पैशाची बॅग आपल्याला सापडल्याची माहिती पोलिसांना दिली.
त्यानंतर गवळी गल्ली कॅम्प येथील रिक्षाचालक होसुरकर याने गेल्या शुक्रवारी सायंकाळी कॅम्प पोलीस ठाण्याच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक पद्मश्री पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पुजेरी रुक्मिणी आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पैशाची बॅग व्यापारी सुरेश जैन यांना सुखरूप परत केली.
त्याबद्दल जैन यांनी होसुरकर यांचे शतशः आभार मानले. ऑटोरिक्षा चालक अनंत होसुरकर यांच्या या दुर्मिळप्रमाणेपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.