शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत कॅनरा बँकेचे एटीएम जळून भस्मसात झाल्याची घटना हुक्केरी येथे आज सकाळी घडली. सदर दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून सुदैवाने कोणालाही अपाय झाला नाही.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, आज गुरुवारी पहाटेपासून हुक्केरी येथे पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे येथील कसाई गल्लीमध्ये असलेल्या कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.
भल्या सकाळी एटीएम आणि आसपासचा परिसर निर्मनुष्य असल्यामुळे आसपासच्या लोकांना उशिरा आगीची कल्पना आली. दरम्यान एटीएममध्ये लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे आग आणि धुराचे लोळ आकाशात उसळत होते. आगीची कल्पना येताच लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.
मात्र आगीच्या भडक्या पुढे त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. त्यामुळे प्रचंड ज्वाळा आणि धूर उसळत एटीएम मशीनसह सर्व साहित्य जळून भस्मसात झाले. सदर दुर्घटनेमध्ये एटीएममधील रोख रक्कम देखील जळाली असून ही रक्कम नेमकी किती होती? याचा आकडा उशिरापर्यंत समजू शकला नाही.
तथापि आगीचे भीषण स्वरूप पाहता लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. एटीएमला लागलेली आग मोठ्या प्रमाणात भडकल्यामुळे आसपासच्या दुकानांचेही नुकसान झाले आहे.