बेळगाव जिल्हा दुष्काळी घोषित करावा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, हालगा -मच्छे बायपास, रिंग रोड हे प्रकल्प रद्द करून बेळगावसाठी फ्लाय ओव्हर ब्रिज प्रकल्प राबवावा आदी विविध मागण्या कर्नाटक राज्य रयत संघ आणि नेगील योगी रयत सेवा संघातर्फे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यावतीने कर्नाटक राज्य रयत संघ आणि नेगील योगी रयत सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपरोक्त निवेदन मुख्यमंत्र्यांकडे धाडण्यासाठी आज शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर केले. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
बेळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करुन आजच्या कर्नाटक अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहिर करत वेगळ्या फंडाची तरतूद करुन दिलासा द्यावा. संकटाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ द्याव. बेळगाव परिसरात अल्पभूधारक शेतकरी असल्याने वेगवेगळ्या विकास कामासाठी सुपीक शेतजमिनींचे बेकायदेशीर भूसंपादन थांबवावे आणि शेतकऱ्यांना कंगाल होण्यापासून वाचवावे. हालगा-मच्छे बायपास, रिंगरोड व इतर प्रकल्प रद्द करुन ते पडिक जमीनीत राबवावेत. बेळगाव शहरासाठीची फ्लाय ओव्हर ब्रिज प्रकल्प योजनां लवकरात लवकर राबवून वाहतूक कोंडीची समस्या दूर करावी. ज्यामुळे शेतकऱ्यांच्याही जमिनीही शाबूत राहतील अशा तपशीलासह अन्य कांही मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहेत.
यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना रयत संघटनेचे बेळगाव तालुका अध्यक्ष राजू मरवे म्हणाले की, राज्यातील मागील भाजप सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केल्यामुळे शेतकऱ्यांनी काँग्रेसला बहुमताने निवडून दिले आहे. याचा विचार करून विद्यमान सरकारने राज्यातील शेतकऱ्यांप्रती आत्मीयता दाखवून त्यांना दिलासा द्यावा. त्याप्रमाणे बेळगाव जिल्ह्यात कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेंव्हा हा जिल्हा दुष्काळी घोषित करून आज जाहीर केल्या जाणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी एक वेगळा निधी मंजूर करावा. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करावी. तसेच बेळगाव परिसरात अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे विकासाच्या नावाखाली ज्या योजना राबविण्यात येत आहेत, त्या रद्द कराव्यात. त्याऐवजी विद्यमान सरकारने आखलेली फ्लावर ब्रिजची योजना अंमलात आणावी.
या योजनेमुळे सुपीक शेत जमीन सुरक्षित राहून शेतकरी जगु शकणार आहे असे सांगून मोफत बस प्रवास योजनेचा लाभ शेतकरी महिलानाही मिळेल याची दक्षता घेतली जावी अशी आमची मागणी आहे, असे मरवे यांनी सांगितले. याप्रसंगी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.