बेळगाव लाईव्ह : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळप्रकरणी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी रयत संघाच्या नेत्या जयश्री गुरन्नवर यांच्या नेतृत्वाखाली आज शहरात विविध संघटनांनी निदर्शने केली.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना शेतकरी नेते सिध्गौडागौडा मोदगी म्हणाले की, देशातील महिला कुस्तीपटूंवर होत असलेल्या लैंगिक हिंसाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कुस्तीपटू दिल्लीतील जंतरमंतरवर गेल्या ४५ दिवसांपासून उपोषण करण्यात येत आहे.
पोलिसांनी आंदोलकांवर ज्या प्रकारे कारवाई केली ते खेदजनक आहे. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून केंद्र सरकार त्यांची चौकशी न करता संरक्षण देत असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
यावेळी शहरातील कन्नड साहित्य भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले.
ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कठोर कारवाई न झाल्यास ५ जून रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

