बेळगाव लाईव्ह : कर्नाटकाची राजधानी असणाऱ्या बेंगळुरू शहराच्या आसपासची गावे बेंगळुरू महानगरपालिकेमध्ये विलीन करण्याद्वारे ‘बृहत बेंगलोर’ बनविण्यात आले आहे.
बृहतबेळगावच्या धर्तीवर आता बेळगाव शहर परिसरातील गावांचे बेळगाव महानगरपालिकेमध्ये विलीनीकरण करून ‘बृहनबेळगाव’ बनविण्याच्या दृष्टीने योजना आखावी, अशी सूचना जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मनपा अधिकाऱ्यांना केली आहे.
बेळगाव शहराच्या आसपास असणारी हिंडलगा, काकती, हलगा, बस्तवाड, कंग्राळी, मोदगा, सांबरा, पिरनवाडी, मच्छे, धामणे आदी गावे महापालिका कार्यक्षेत्रात समाविष्ट करून बृहन बेळगावची निर्मिती करण्याचा संकल्प सतीश जारकीहोळी यांनी केला आहे. बेळगाव शहराच्या आसपास असणारी दहा गावे शहराजवळ असून देखील ती नगर विकास खात्याच्या योजनांसह अन्य सरकारी सुविधा आणि योजनांपासून वंचित आहेत.
या गावांना शहराला मिळणाऱ्या मूलभूत नागरी सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत, असे मंत्री सतीश जारकीहोळी यांना मनापासून वाटते. यासाठी त्यांनी जिल्हा पालकमंत्री या नात्याने पहिल्यांदाच महानगरपालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीत मंत्री जारकीहोळी यांनी बेळगावच्या आसपासची गावे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट करण्याच्या दृष्टीने योजना आखावी. तसेच बृहत बेळगाव निर्मितीचा प्रस्ताव तयार करावा, सूचना अधिकाऱ्यांना केली आहे.