बेळगाव लाईव्ह : शेतकऱ्यांच्या शेकडो एकर सुपीक जमिनी संपादित करून आखण्यात आलेला रिंग रोडचा प्रस्ताव रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र दुसरीकडे रिंग रोड साठी अनेक ठिकाणचे सर्वेक्षण करण्यात येत असून यासाठी शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
रिंग रोडला विरोध दर्शविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयात शेतकऱ्यांच्या तक्रारी दाखल करून घेण्यात येत असून आजच्या सुनावणीदरम्यान उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा रिंग रोड ला तीव्र विरोध दर्शवत आपला रिंगरोड साठी ठाम विरोध असल्याचे सांगितले.
आजच्या सुनावणीदरम्यान प्रत्येक शेतकऱ्याने रिंगरोडला विरोध तर दर्शविलाच मात्र कोणत्याही परिस्थितीत आपण आपली जमीन देणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम निर्धार व्यक्त केला. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नुकसान भरपाई देण्याबाबत सांगण्यात आले.
मात्र शेतकऱ्यांनी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या नुकसान भरपाईची गरज नसून आपल्याला आपली शेतीच हवी असा पवित्रा घेतला.
जवळपास ४० ते ५० शेतकऱ्यांनी आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयात रिंगरोड विरोधात तक्रार नोंदविली आहे. यावेळी विवेक पाटील, ऍड. शाम पाटील, सुनील अष्टेकर, अजित पुजारी, भाऊ जाधव यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.