बेळगाव लाईव्ह : अनैतिक संबंधातून एका विवाहितेने आपला प्रियकर आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने पतीचा खून करून तो बेपत्ता झाल्याची तक्रार स्वतःच पोलीस ठाण्यात नोंदवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी पोलिसांनी त्या विवाहितेसह चौघाजणांना ताब्यात घेतले आहे.
स्वतःच्या पतीला यमसदनी धाडणाऱ्या आरोपी महिलेचे नांव संध्या रमेश कांबळे असे आहे. सध्या संध्यासह तिचा प्रियकर बाळू बिरंजे व त्याचे दोन साथीदार अशा चौघा जणांना एपीएमसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या तीन महिन्यापूर्वी आपला पती बेपत्ता झाला असल्याची तक्रार संध्या हिने एपीएमसी पोलीस ठाण्यात नोंदविली होती.
तपासा दरम्यान पोलिसांनी संशयावरून संध्याची चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला. तीन महिन्यापूर्वी आपणच आपला प्रियकर आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने स्वतःचा पती रमेश कांबळे याचा खून केला असल्याचे तिने सांगितले.
आपले परपुरुषाशी असलेले अनैतिक संबंध पती रमेश याला समजल्यामुळे आपण त्याचा काटा काढला असे स्पष्ट केल्यामुळे संध्या कांबळे सध्या तुरुंगाची हवा खात आहे.
त्याचप्रमाणे तिच्या तीन साथीदारांना देखील गजाआड करण्यात आले आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.
मृतदेह गोव्यातील चोर्ला घाटात
आरोपी पत्नीने पोलीस तपासात कबूल केले की तिने प्रियकर बाळूसोबत त्याच्या मित्रांच्या सहाय्याने हत्या करून मृतदेह गोव्यातील चोर्ला घाटात फेकून दिला. रमेशला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि नंतर गळा आवळून खून केल्याचे चौकशीदरम्यान सांगण्यात आले. बेळगावच्या एपीएमसी पोलिसांनी याप्रकरणी 4 आरोपींना अटक केली असून रमेशच्या मृतदेहाचा शोध सुरू केला आहे.