अवास्तव अन्यायी वीज दरवाढ तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी शहरातील विणकर समाज बांधवांनी आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आणि नेहरूनगर येथील हेस्कॉम कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन सादर केले.
उत्तर कर्नाटक व्यावसायिक विणकर संघर्ष समिती, बेळगाव जिल्हा शाखेच्या नेतृत्वाखाली विणकर बांधवांनी आज सकाळी वीज दरवाढीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. मोर्चादरम्यान निषेधाच्या आणि दरवाढ रद्द करण्याच्या घोषणा देण्यात येत होत्या. यावेळी विणकर बांधवांनी हातात धरलेले वीज दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांचे फलक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
सदर मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालय आवारामध्ये सभेत रुपांतर झाले. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनात अवास्तव वीज दरवाढीमुळे विणकारांना होणारा त्रास तसेच वीज दर वाढ रद्द करण्याच्या मागणीसह अन्य मागण्या नमूद आहेत.
सभेप्रसंगी विणकर नेत्यांनी सरकारकडून विणकर समाजावर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली. तसेच अन्यायी वीज दरवाढीबद्दल राज्य सरकार आणि हेस्कॉमवर कडाडून टीका करण्याबरोबरच त्यांचा निषेध केला. त्याचप्रमाणे वीज दरवाढ तात्काळ रद्द करावी अशी मागणी केली.
विणकर समाज बांधव मोठ्या संख्येने मोर्चा सहभागी झाले असल्यामुळे सभेप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात एकच गर्दी झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विणकर समाजाचे नेते व्यंकटेश सोनटक्की यांनी अवास्तव वीज दर वाढीचा निषेध केला. याआधी आम्हाला 700 ते 800 रुपये येणारे वीज बिल आता 1400 रुपयांपर्यंत येत आहे. सध्याच्या महागाईच्या दिवसात राबलेले पैसे आम्हाला सरकारच्या या ना त्या करासाठी भरावे लागत आहेत.
यात भर म्हणून आता या अन्यायी वीज दरवाढीच्या भुर्दंडामुळे आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब होऊन आमच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ येणार आहे. तेंव्हा सरकारने एफएसीसह करण्यात आलेली वीज दर वाढ तात्काळ आजच्या आज रद्द करावी अशी मागणी सोनटक्की यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांप्रमाणे विणकर समाज बांधवांनी मोर्चाने नेहरूनगर येथील हेस्कॉमच्या बेळगाव विभागीय कार्यालयावर जाऊन तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आणि वीज दरवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.