बेळगाव लाईव्ह : जिल्हा आणि तालुका पंचायतीच्या निवडणुकीची तयारी राज्य निवडणूक आयोगाकडून हाती घेण्यात आली असून जिल्हा आणि तालुका पंचायतीची प्रारूप मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाने दोन दिवसापूर्वीच २३ जून रोजी जाहीर केली आहे. याबाबत ४ जुलै पर्यंत यावर आक्षेप नोंदविता येणार आहेत. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.
मतदान केंद्राची स्थापना आणि मतदार यादी तयार करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने २६ मे रोजी बजावले होते.
तालुका पंचायतीची मतदार यादी जिल्हा पंचायतीच्या मतदार यादीचा भाग असते. तर जिल्हा पंचायतीची मतदार यादी विधानसभा मतदार यादीच्या आधारावर तयार केली जाते. तालुका आणि जिल्हा पंचायत मतदार संघ पुनर्रचनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या सीमा निर्णय आयोगाच्या अधिसूचनेनुसार मतदार यादी तयार करण्यात आली आहे.
विधानसभेची अंतिम मतदार यादी ५ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली आहे. हा डेटा वापरूनच जिल्हा पंचायत मतदार संघाची यादी तयार करण्याची सूचना होती. त्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी २३ जून रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर केली असून त्यावर ४ जुलैपर्यंत अक्षेप दाखल करता येणार आहे.
७ जुलै रोजी आक्षेप निकाली काढले जाणार आहेत. त्यानंतर १२ जुलै रोजी मुद्रांकडून मतदार यादीत आवश्यकते बदल करून घेतल्या जाणार आहेत. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर अंतिम मतदार यादीची तारीख निश्चित केली जाणार आहे.