Thursday, January 30, 2025

/

ट्रू जेट पुन्हा बेळगावातून टेकऑफ घेणार

 belgaum

गेल्या फेब्रुवारी 2022 मध्ये आपल्या सर्व विमान फेऱ्या बंद करणाऱ्या हैदराबादच्या ट्रू जेट या विमान कंपनीची 5 टक्के भागीदारी आपण मिळविली असल्याची घोषणा अमेरिका स्थित एन. एस. एव्हिएशन या कंपनीने गेल्या सोमवारी केली आहे. हे संपादन 450 कोटी मूल्याचे असून जे लवकरच पूर्ण केले जाईल, अशी माहिती एन. एस. एव्हीएशनच्या व्हाईस चेअरमन ईशा अली यांनी दिली.

भारतामध्ये 100 एअरबस 320 निओ एअरक्राफ्ट सुरू करण्याचा एन. एस. एव्हिएशनचा विचार असून त्यासाठी प्रारंभी मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता आणि हैदराबाद सारख्या मेट्रो शहरांच्या प्रादेशिक विमान फेऱ्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या विमानतळांचा वापर करून नजीकच्या काळात सदर कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला विस्तार वाढविण्याची योजना आखत आहे.

एन. एस. एव्हीएशनकडून ताजी गुंतवणूक केली जाणार असल्यामुळे ट्रू जेट आपल्या विमान सेवा पुन्हा सुरू करण्यास उत्सुक आहे. त्याचप्रमाणे उडान कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित करून आपले जाळे अधिक बळकट करण्याबरोबरच पूर्वी ज्या ठिकाणी आपली विमानसेवा नव्हती त्या प्रदेशात ती सेवा सुरू करणे आणि हवाई प्रवास अधिक सुकर करणे यावर ट्रू जेट कंपनीने आपले लक्ष केंद्रित केले आहे.

 belgaum

संपूर्ण भारतात आपली कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी ट्रू जेटकडे सध्या असलेल्या परवान्यांच्या आधारे उडानच्या 116 मार्गांवर विमान सेवा सुरू करण्याचा एन. एस. एव्हीएशनचा विचार आहे. यासाठी मेट्रो आणि टायर -2 शहरांवर लक्ष केंद्रित करून आपल्या विमान ताफ्यामध्ये ही एअरलाइन्स कंपनी 100 एअरबस 320 निओ एअरक्राफ्टची भरती करणार आहे.

त्यामुळे स्पर्धात्मक शुल्क, आकर्षक ऑफर्स आणि प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मोफत भोजन उपलब्ध करण्याद्वारे ट्रू जेट विमान सेवा येत्या ऑक्टोबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. उडान अंतर्गत ट्रू जेटच्या बेळगाव येथून पुढील प्रमाणे चार सेवा आहेत. बेळगाव ते हैदराबाद, बेळगाव ते कडप्पा, बेळगाव ते म्हैसूर आणि बेळगाव ते तिरुपती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.