सध्याच्या पाणी टंचाईवर मात करून गरजूंना टँकरने पाणी पुरवण्याची आमची योजना आहे. मात्र पाण्याच्या प्रति टँकरच्या वास्तव दरामुळे समस्या निर्माण झाली आहे. तरी आमच्या जनहितार्थ योजनेसाठी खाजगी पाणी पुरवठा करणाऱ्यांनी योग्य दरात आम्हाला टँकर उपलब्ध करून द्यावेत.
तसेच जागरूक नागरिकांनी तीव्र पाणी टंचाईच्या भागाची माहिती द्यावी, असे आवाहन फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी केले आहे.
आपण सर्व बेळगाववासीय एका कुटुंबाप्रमाणे असल्यामुळे प्रसिद्धीसाठी टँकरने पाणी भरून घेणाऱ्या कुटुंबाचे अथवा लोकांचे फोटो मला नको आहेत. कोठे खरोखर पाण्याची तीव्र टंचाई आहे याची माहिती देऊन तुम्ही मला मदत करू शकता.
तसेच जर कोणी आम्हाला प्रति टँकर 500 रुपये दराने पाणी उपलब्ध करून दिल्यास 20 टँकर पाणी पुरवठा करण्याची आमची योजना आहे. मात्र टँकर सरासरी 5 हजार लिटरहून अधिक क्षमतेचे असावेत. सध्या पाण्याचे टँकर पुरवठादार प्रति टँकर 800 ते 1500 रुपये दर सांगत असून हा दर अवास्तव न परवडणारा आहे. त्यामुळे इच्छा असून देखील आम्ही लोकांना मदत करू शकत नाही अशी परिस्थिती आहे.
तेंव्हा जाणकार अनुभवी मंडळींनी आम्हाला मार्गदर्शन करून सहकार्य करावे. ईश्वर म्हणतो जे भुकेले आहेत त्यांना खायला द्या, जे तहानलेले आहेत त्यांना पाणी द्या, ज्यांना रक्ताची गरज आहे त्यांना रक्तदान करा. आम्हालाही जनसेवा करायची आहे, मात्र ती सत्याच्या मार्गाने. आम्हाला पैसे अथवा कोणतीही देणगी नको.
आपल्या सर्वांचे सहकार्य तसेच योग्य दरात पाण्याचे टँकर आणि पाण्याची आवश्यकता असलेले ठिकाणांची माहिती याची गरज आहे. तरी कृपया सहकार्य करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर (9986809825) यांनी केले आहे.