बेळगाव लाईव्ह : प्रधानमंत्री पोषण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना सकस आहार पुरविला जातो. दुपारच्या जेवणासोबत विद्यार्थ्यांना पोषक जीवनसत्वे मिळावीत यासाठी अंडी व चिक्की वितरण केली जाते. राज्यात मागील वर्षापासून आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांना अंडी वितरण सुरू करण्यात आले.
जे विद्यार्थी शाकाहारी आहेत, त्यांना अंड्याऐवजी शेंगदाणा चिक्की किंवा केळी दिली जातात. मात्र शाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले तरी अद्याप अंडी, केळी व चिक्कीचे वाटप करण्यात आले नव्हते. अखेर शिक्षण विभागाला याची जाणीव झाली असून अंडी, केळी व चिक्की वितरण सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा या उद्देशाने अंडी, शेंगदाणा चिक्की व केळी यांचे वाटप केले जाते. मे महिन्याच्या अखेरीला या वर्षाच्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ झाला.
मात्र शाळा सुरू होऊन २० दिवस होत आले तरी चिक्की, केळी व अंड्यांचे वाटप करण्यात आले नव्हते. यासंदर्भात काहींनी सरकारकडे तक्रारही केली. याची दखल घेत सार्वजनिक शिक्षण विभागाने मंगळवार दि. २० जून रोजी चिक्की व अंडी वितरणाचा अध्यादेश काढला आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबतचा अध्यादेश पाठविण्यात आला असून लवकरच चिक्की, केळी व अंड्यांचे वाटप सुरू करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. शाळेचे मुख्याध्यापक व एसडीएमसी कमिटीच्या देखरेखीखाली विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप करावे.
पहिली ते आठवीपर्यंतच्या सरकारी व अनुदानित शाळांमध्ये आहाराचे वाटप करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हा पंचायत व तालुका पंचायतीच्या अधिकाऱ्यांनाही सूचना करण्यात आल्या आहेत.