बेळगावच्या रेस कोर्स मैदानाजवळ असलेला अरगन तलाव हा ब्रिटिशकालीन तलाव आहे. त्याकाळी या तलावाला “अवरगन टॅंक’ असे संबोधले जात होते.
ब्रिटिश काळात तासाचा (अवर) कालावधी दर्शविण्यासाठी हवेत बंदुकीचा बार काढला जायचा. त्यासाठी संबंधित बंदुकीला ‘अवर गन’ म्हंटले जायचे.
त्यावरून हिंडलगा श्री गणपती मंदिर आणि रेस कोर्स मैदाना नजीकच्या तलावाला “अवरगन टॅंक” असे संबोधले जात असावे. तथापि आणखी एका सूत्रानुसार या भागातील बदकांची शिकार करण्यासाठी ब्रिटिश एअरगन बंदुकीचा वापर करत होते.
त्यामुळे या तलावाला अरगन टॅंक अर्थात अरगन तलाव असे नांव देण्यात आले. एकंदर या तलावाच्या नावाच्या बाबतीत मत भिन्नता असल्यामुळे अरगन तलाव हे नांव कशामुळे पडले याचे नेमके स्पष्टीकरण अद्यापही मिळालेले नाही.
बेळगाव रेस कोर्स मैदाना जवळ असलेला अरगन तलाव हा 5 तलावांचा समूह आहे. हे तलाव एकमेकाला जोडलेले आहेत.
त्यामुळे पहिला तलाव काठोकाठ भरून ओसंडला की त्याद्वारे दुसरा त्यानंतर तिसरा, चौथा, पाचवा या क्रमाने हे तलाव पाण्याने भरतात हे विशेष होय.