प्रादेशिक आयुक्तांच्या बदलीमुळे बेळगाव महापालिकेच्या स्थायी समित्यांची निवडणूक पुन्हा लांबणीवर पडली असून सदर निवडणूक आता येत्या 1 जुलैला 2023 रोजी होण्याची शक्यता असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.
बेळगाव महापालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक पुन्हा लांबणीवर पडल्याची माहिती प्रादेशिक आयुक्त कार्यालयातील सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. तथापि निवडणुकीची नवी तारीख अद्याप अधिकृतरित्या जाहीर केलेली नाही.
नवे निवडणूक वेळापत्रक प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडून अधिकृतरित्या जाहीर झाल्यानंतरच याबाबतची माहिती नगरसेवकांना दिली जाणार आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार 27 जून रोजी स्थायी समित्यांची निवडणूक घेतली जाणार होती. मात्र आता प्रादेशिक आयुक्त बदलल्यामुळे निवडणूक तारीख देखील बदलण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
आता जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे प्रादेशिक आयुक्त पदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता स्थायी समिती निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालीच होणार आहे.
निवडणूक वेळापत्रकातील बदल दोन दिवसात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीची पूर्वतयारी महापालिकेच्या कौन्सिल विभागाने केली आहे. मात्र अचानक काल बुधवारी निवडणुकीच्या तारखेत बदल केल्याची माहिती महापालिकेच्या कौन्सिल सेक्रेटरीना देण्यात आली आहे.
अर्थात ही माहिती तोंडी देण्यात आल्याने नगरसेवकांना त्याबाबत कळविण्यात आलेले नाही. मात्र 1 जुलै रोजी निवडणूक घेण्याचे निश्चित झाले तर नगरसेवकांना नव्याने नोटीस पाठवली जाणार आहे.