बेळगाव शहर विकास प्राधिकरणाकडून (बुडा) भूखंड वितरणात बेकायदेशीर गैरप्रकार प्रकार करण्यात आल्याच्या आरोपाची राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याची मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली आहे.
बेळगाव येथे काल बुधवारी ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री जारकीहोळी म्हणाले की, भूखंडाचे वाटप करताना बुडाच्या अधिकाऱ्यांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन लिलाव प्रक्रिया व वितरणात गंभीर चुका केल्या असल्याच्या कांही तक्रारी सरकारकडे आल्या आहेत.
बेळगावच्या चौथ्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निर्देशानुसार लोकायुक्त पोलिसांनी बुडाचे माजी आयुक्त प्रीतम नसलापुरे आणि अन्य काही अधिकाऱ्या विरुद्ध नियम भंग केल्याप्रकरणी एफवायआर नोंदवले आहे. आम आदमी पक्षाचे नेते राजीव टोपण्णावर यांनी नसलापुरे आणि संबंधित इतर अधिकारी अनेक नियमांचा भंग करत असल्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करावी यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.
यासंदर्भात टोपण्णावर यांनी लोकायुक्त अधिकाऱ्यांकडे कागदोपत्री पुरावा ही सादर केला आहे. या अधिकाऱ्यांनी केलेल्या घोटाळ्यामुळे सरकारचे 150 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शहरातील मोक्याचे चांगले भूखंड या अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करून कांही खास व्यक्तींना दिले आहेत.
बुडाच्या अधिकाऱ्यांनी कोपऱ्यावर असलेले कांही मोक्याच्या निवासी भूखंडांचा पारदर्शकता न ठेवता अतिशय कमी कवडीमोल दरात मॅन्युअल लिलाव केला असल्याचे तक्रारीत नमूद आहे असे सांगून उपजिल्हाप्रमुख भरत रेड्डी हे या प्रकरणी तपास करत असल्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.