बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या स्थायी समितीसाठी २७ जून रोजी निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. बेळगाव महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असून २७ रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीवर सदस्यांची नेमणूक होणार आहे.
स्थायी समितीमध्ये आरोग्य, वित्त, लेखा व सार्वजनिक बांधकाम समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. प्रत्येक समितीमध्ये ७ सदस्य असतील तसेच प्रत्येक समितीमध्ये सत्ताधारी पक्षाचे चार आणि विरोधी पक्षांचे तीन सदस्य असावेत, अशी बेळगाव महापालिकेची प्रथा आहे.
२७ जून रोजी स्थापन होणाऱ्या स्थायी समितीनंतर अध्यक्षांची निवड केली जाईल. महापालिकेच्या इतिहासात स्थायी समित्यांच्या निवडीसाठी तत्कालीन महापौर यल्लाप्पा कुरबर यांच्या कार्यकाळात २००९ मध्येच निवडणुका झाल्या.
यादरम्यान माजी आमदार कै. संभाजी पाटील यांनी सत्ताधारी गट सोडला आणि यावेळी निर्माण झालेल्या मतभेदांमुळे सत्ताधारी आणि विरोधी गट यांच्यात स्थायी समित्यांची २००९ मध्ये निवडणूक झाली.
बेळगाव महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असून, नगरसेवक मंगेश पवार, गिरीश धोंगडी, नंदू मिरजकर,आणि विरोधी पक्ष नेते मुझम्मिल डोणी, वाणी विलास जोशी यांची स्थायी समिती अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.