बेळगाव लाईव्ह : वडगाव येथील अन्नपूर्णेश्वरी नगर येथे तीन दिवसापूर्वी झोपलेल्या दाम्पत्याला सर्पदंश झाला होता. यामध्ये वॉचमन म्हणून काम करत असलेल्या सिद्धपा नामक व्यक्तीचे निधन झाले.
दंश झाल्यानंतर सर्पमित्र आनंद चिट्ठी यांनी घटनास्थळी भेट देऊन सापाचा शोध घेतला मात्र साप सापडला नव्हता. अखेर तिसऱ्या दिवशी नागसाप शोधून त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम आनंद चिट्ठी यांनी केले आहे.
तीन दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेनंतर सापाचा शोध घेण्यात आला होता. मात्र साप त्या ठिकाणाहून निसटल्याने परिसरातील नागरिक घाबरले होते. आज याच भागातील कर्मचाऱ्याला पुन्हा एकदा साप दिसला आणि तात्काळ त्यांनी आनंद चिठ्ठी यांना पाचारण केले.
साधारण तीन वर्षाचा, नर जातीचा नाग साप असून वॉचमनच्या खोलीत अडगळ आणि उंदीर असल्याने भक्ष्याच्या शोधात नागसाप आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भक्ष्याच्या शोधात आलेल्या सापाने वॉचमनला दंश केल्याने वॉचमॅनचा मृत्यू झाला आहे.
मागील आठ दिवसात या परिसरात लहान पिल्ले व मोठे असे आठ साप सापडले असून आसपास शेतशिवराजवळ घरे असणाऱ्या आणि नवीन बांधकाम करणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांनी केले आहे.