बेळगाव शहरातील बी. एस. येडीयुराप्पा मार्गावर सुरू करण्यात आलेले ड्रेनेज पाईपलाईन घालण्याचे काम सध्या अर्धवट अवस्थेत पडून असल्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढला आहे.
शहरातील बी. एस. येडीयुराप्पा मार्गावर अलीकडे ड्रेनेज पाईपलाईन घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून हे काम थांबवून अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आले आहे पाईपलाईन घालण्यासाठी रस्त्याला लागून मोठी चर खोदण्यात आली असून तरी ती दगड मातीचा ढिगारा रस्त्यावर टाकण्यात आला आहे.
परिणामी हा ढिगारा या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे. दिवसा रस्त्यावर पडलेला मातीचा ढीग आणि खोदलेली चर वाहन चालकांना दिसत असली तरी रात्रीच्या वेळी अंधारात या ठिकाणी एखादा गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आता पावसाळा केंव्हाही सुरू होऊ शकतो जर तसे झाल्या येडीयुराप्पा मार्गावरील हे खोदकाम अधिकच धोकादायक ठरणार आहे. कारण पावसामुळे माती रस्त्यावर वाहून सर्वत्र दलदलीचे निसरडे साम्राज्य पसरणार आहे.
जे वाहन चालकांसाठी विशेष करून दुचाकी वाहन चालकांसाठी अपायकारक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी लोकप्रतिनिधींसह संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बी. एस. येडीयुराप्पा मार्गावरील ड्रेनेज पाईपलाईन घालण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.