सिद्धेश्वर गल्ली, पिरनवाडी तेथील एका बाजूच्या गटारीचे बांधकाम अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आले आहे. परिणामी गटारीतील तुबलेल्या सांडपाण्यामुळे नागरिकांचे विशेष करून लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले असून लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
या संदर्भात बेळगावला लाईव्हच्या प्रतिनिधीने आज रविवारी सिद्धेश्वर गल्ली येथे भेट देऊन परिस्थिती तसेच तेथील रहिवाशांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी ज्येष्ठ नागरिक नंदकुमार मल्लाप्पा मुचंडीकर म्हणाले की, स्थानिक लोक प्रतिनिधीनी मतांसाठी म्हणजे आमच्या गल्लीत पुढे असलेल्या मठासाठी हे गटारीचे काम केले आहे. मात्र हे काम करताना ते व्यवस्थित पूर्ण होईल याकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केल्यामुळे कंत्राटदाराने गटारीचे काम अर्धवट अवस्थेत सोडलेले आहे सदर गटार सीडी वर्कद्वारे रस्त्यापलीकडे असलेल्या गटारीला जोडण्यात आलेली नाही.
त्यामुळे सांडपाण्याचा निचरा न होता गल्लीतील संपूर्ण गटार तुंबली आहे. परिणामी दुर्गंधी बरोबरच डास -माशांचा प्रादुर्भाव वाढला असून तुंबलेल्या गटारातील सेप्टीक किडे घरांमध्ये शिरत आहेत. परिणामी प्रत्येक कुटुंबातील सदस्यांचे विशेष करून गल्लीतील लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे असे सांगून याबाबत वारंवार तक्रार करून देखील संबंधित अधिकारी एकदाही पाहणी आणि चौकशी करण्यासाठी या ठिकाणी फिरकले नसल्याची तक्रार मुचंडीकर यांनी केली.
माझ्या घरातील चार जण आजारी पडले आहेत. माझ्या मुलाला डेंग्यू ,-टायफाईड झाला आहे. या पद्धतीने गल्लीतील प्रत्येक कुटुंबातील एखाद दुसऱ्याला आजार झाला आहे. आमदारांनी हे राजकारण फक्त आमच्या गल्लीत पुढे असलेल्या मठासाठी केले आहे.
मात्र त्याचा फटका आम्हा सर्वांना बसत असून गटारीतील जीवघेण्या सांडपाण्याच्या सानिध्यात आम्ही जगायचं तरी कसं? आम्ही मेल्यानंतरच हे गटार पुढच्या गटारीला जोडणार का? असा संतप्त सवालही नंदकुमार मुचंडीकर यांनी केला. रस्त्याच्या ठिकाणी सीडी वर्क करून सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी आमच्या गल्लीतील गटार पुढील गटारीला जोडणे आवश्यक असताना कामचुकार कंत्राटदाराने हे काम केलेलेच नाही. तेंव्हा लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
तसेच सिद्धेश्वर गल्लीतील एखाद्याचा आजारामुळे बळी जाण्यापूर्वी आमच्या गल्लीतील गटार पुढे असलेल्या गटारीला जोडण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी शेवटी नंदकुमार मुचंडीकर यांनी केली. याप्रसंगी प्रकाश मुचंडीकर,मनोहर कदम, महादेव मुतगेकर, लक्ष्मण मुचंडीकर, बसवंत राऊत, सचिन राऊत, जोतिबा लोहार आदिसह सिद्धेश्वर गल्लीतील नागरिक उपस्थित होते.