शहापूर शिवारासह येळ्ळूर, धामणे आणि इतर शिवारांना वरदान ठरणाऱ्या शहरानजीकच्या जुन्या तलावांपैकी एक असलेल्या ब्रिटिशकालीन शहापूर तलावाची युद्धपातळीवर खुदाई करून त्याच्या विकासाचे काम लघुपाटबंधारे खात्याने हाती घेतल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मायनर इरिगेशन कडून दोन कोटी हून अधिक निधीतून सदर काम केले जात आहे.
या संदर्भात बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधीने आज गुरुवारी शहापूर तलावाला भेट देऊन त्या ठिकाणी उपस्थित बेळगाव तालुका रयत संघटनेचे अध्यक्ष राजू मरवे यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली असता ते म्हणाले की, शहापूर शिवारासह येळ्ळूर, धामणे आणि इतर शिवारांना वरदान ठरलेल्या शहापूर शिवारातील सर्व्हे नं. 61 मध्ये असलेल्या शहापूर तलावाचे क्षेत्रफळ 4 एकर 13 गुंठे आहे. हा ब्रिटिशकालीन तलाव असल्यामुळे त्याची बांधणी योग्य प्रकारे करण्यात आली आहे. या तलावाच्या नैऋत्येकडे एक दरवाजा आणि ईशान्येला एक दरवाजा आहे. हे दरवाजांचे नियोजन यासाठी होते की वरून येळ्ळूरकडून येणारे पाणी कालव्याद्वारे तलावात यावे आणि तलाव भरल्यानंतर त्याचा उपयोग शहापूर, धामणे किंवा येळ्ळूर परिसरातील शेतकऱ्यांना व्हावा. दुष्काळातही पाण्याची सोय व्हावी या पद्धतीने ब्रिटिशांनी या तलावाची निर्मिती केली होती.
सदर तलावाचा या भागातील शेतकऱ्यांना अत्यंत चांगला उपयोग होणार असल्यामुळे आम्ही गेल्या 2006 साली तत्कालीन आमदार मनोहर किणेकर यांना विनंती करून तलावाची थोडीफार खोदाई करून घेण्यात आली होती. पावसामुळे ते काम त्यावेळी थांबले. त्यानंतर आजतागायत या तलावाचे खोदकाम करण्याद्वारे गाळ काढून देखभाल करण्यात आली नव्हती. यासाठी गेल्या 2013 पासून आम्ही एच. डी. कुमारस्वामी सरकार, येडीयुरप्पा सरकार, सिद्धरामय्या सरकार आणि अलीकडचे बोम्मई सरकार यांना आमची शेतकरी कमिटी आणि या भागातील शेतकऱ्यांनतर्फे वेळोवेळी निवेदने दिली होती. तसेच त्या निवेदनांचा पाठपुरावा करत राहिलो होतो. त्याचे फळ म्हणजे सध्याच्या नवनिर्वाचित काँग्रेस सरकारने लघुपाट बंधारे खात्याच्या निधीतून या तलावाच्या विकासासाठी निधी मंजूर केला आहे. या निधीतून सध्या तलावाचे खोदकाम करून विकास केला जात आहे. या पद्धतीने निधीचा योग्य विनियोग होत असल्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे, अशी माहिती मरवे यांनी दिली.
सदर तलाव या भागातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी देणारा ठरणार आहे. याखेरीज सदर तलावात पाणी आल्यास या भागातील भूमिगत अंतर्जल साठ्यात वाढ होणार आहे. या भागातील शेतकरी काकडी, वांगी, पालेभाज्या अशी पिके घेतात. या पिकांना सदर तलावाद्वारे मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. सध्या लघु पाटबंधारे खात्याने तलाव खोदाईचे काम सुरू केल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा आढावा बैठकीप्रसंगी माननीय मंत्री सतीश जारकीहोळी यांना आम्ही तलावासंदर्भात रिमाइंडर स्वरूपाचे निवेदन दिले होते आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशीच तलाव खुदाई सुरू झाली. याबद्दल लघु पाटबंधारे खाते आणि सरकारला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत, असे राजू मरवे शेवटी म्हणाले. यावेळी उपस्थित पाटबंधारे खात्याच्या एका अधिकाऱ्याने तलावाच्या विकास कामाची थोडक्यात माहिती देऊन या तलावातील पाणी शेती बरोबरच पिण्यासाठीही वापरले जाईल या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे स्पष्ट केले.