बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये पुन्हा बेकायदा वाळू व्यवसायाला तेजीचे दिवस आले असून नदीतील वाळू उपसा करण्यासाठी निविदा प्रक्रिया रखडल्यामुळे वाळूचे दर गगनाला भिडले आहे. एका टिप्परसाठी तब्बल 20 ते 22 हजार रुपये मोजावे लागत असून वाळूच्या दरामुळे घर बांधकाम करणार्यांना मात्र फटका सहन करावा लागत आहे.
सरकारने लोकांना वाळूची समस्या होऊ नये यासाठी तसेच कमी दरात वाळू मिळावी, यासाठी नदीच्या वाळूला पर्याय म्हणून एमसॅण्ड केंद्र सुरू केली आहेत. जिल्ह्यात नदीतील वाळू उपशासाठी दहा ठिकाणी ब्लॉक आहेत तर 48 एमसॅण्डची केंद्रे आहेत. त्यामुळे बांधकाम व्यवसाय आधार मिळाला आहे. पण नदीतील वाळू मात्र मिळणे दुरापास्त झाली असून त्याचे दरही गगनाला भिडले आहेत. त्याचा फटका लोकांना सहन करावा लागत आहे
खानापूर, रामदुर्ग वगळता इतर ठिकाणी अधिकृत नदीची वाळू मिळत नाही. गोकाक, मुडलगी, रायबाग, बैलहोंगल, सौंदत्ती, हुक्केरी येथे नदीतील वाळू काढण्यास परवानगी नाही.
वाळूचा तुटवडा निर्माण झाला असल्यामुळे नवीन ब्लॉक निर्माण करण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासनाकडून योग्य दरात वाळू उपलब्ध व्हावी, यासाठी कारवाई होणे गरजेचे आहे.
नदीतील वाळू मिळण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे सरकारच्या वस्ती योजना व इतर बांधकाम व्यवसायातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.