काँग्रेस रोडवरील रेल्वे मार्गाशेजारील तिसऱ्या रेल्वे गेटपर्यंतची रेल्वे संरक्षक भिंत तसेच या मार्गावरील कांही झाडे आणि झाडांच्या फांद्या धोकादायक अवस्थेत असून संभाव्य रेल्वे दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन आणि रेल्वे खात्याने त्याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी केली आहे.
शहरातील जागरूक नागरिकांपैकी एक असलेले फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर हे गेल्या 1 वर्षापासून काँग्रेस रोडवरील मिलिटरी महादेव मंदिरापासून ते तिसऱ्या रेल्वे गेट पर्यंतच्या रेल्वे मार्गा शेजारी असलेल्या संरक्षक भिंतीबाबत आवाज उठवत आहेत.
पाया व्यवस्थित नसल्यामुळे सदर भिंत कांही ठिकाणी रेल्वे मार्गाच्या बाजूला अथवा रस्त्याच्या फुटपाथच्या दिशेने धोकादायकरित्या कलली आहे. याखेरीज सदर रेल्वे मार्ग शेजारील जुन्या वृक्षांच्या फांद्या रेल्वे मार्गावर विस्तारल्या आहेत. यापैकी कांही फांद्या सुकलेल्या आहेत. आता पावसाळ्याला सुरुवात होणार आहे अशा परिस्थितीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यास रेल्वे मार्ग शेजारील संरक्षक भिंतीचा संबंधित धोकादायक भाग आणि झाडांच्या फांद्या कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याखेरीज काँग्रेस रोड मार्गावर काही दारूची दुकाने आहेत. त्यामुळे रेल्वे मार्गा शेजारी जीर्ण झालेल्या झाडांना विघ्नसंतोषी मद्यपी लोकांकडून आग लावण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तरी याची गांभीर्याने दखल घेऊन धोकादायक बनलेली संरक्षक भिंत व्यवस्थित सुरक्षित करावी तसेच रेल्वे मार्गावरील धोकादायक फांद्यांचे वेळीच उच्चाटन करावे.
या खेरीज मिलिटरी महादेव मंदिरा समोरील रेल्वे मार्गाशेजारील नाल्यामध्ये निचरा न झाल्यामुळे सध्या सांडपाणी देखील मोठ्या प्रमाणात तुंबले आहे. त्यामुळे दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. याकडे देखील रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांच्यासह या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे.