पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युनायटेड स्टेट्स (अमेरिका) काँग्रेस समोर गेल्या 22 जून रोजी झालेल्या ऐतिहासिक भाषणाप्रसंगी त्यांना एस्कॉर्ट करण्याचा बहुमान अमेरिकन काँग्रेसचे भारतीय वंशाचे प्रतिनिधी (खासदार) आणि बेळगावचे सुपुत्र श्री ठाणेदार यांना मिळाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेच्या संसदेसमोर भाषण करण्यासाठी सभागृहात आगमन झाल्यानंतर मूळचे मिरापूर गल्ली, शहापूर, बेळगावचे अमेरिकेतील खासदार श्री ठाणेदार यांनी पंतप्रधानांचे स्वागत करून त्यांना सन्मानाने भाषणाच्या ठिकाणी नेले (एस्कॉर्ट) होते.
त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन आणि त्यांच्या पत्नी जील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ भोजन कार्यक्रम आयोजित केला होता. खासदार श्री ठाणेदार यांना देखील या कार्यक्रमासाठी सपत्नीक निमंत्रण होते.
त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अत्यंत आपुलकीने खासदार श्री ठाणेदार यांची चौकशी करून त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या.
तसेच ठाणेदार यांनी मिळवलेले यश आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. ही बाब समस्त बेळगावकरांसाठी अभिमानास्पद म्हणावी लागेल.