Saturday, December 21, 2024

/

आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळे यंत्रणेवर ताण

 belgaum

बेळगाव लाईव्ह : जिल्हा आरोग्य खात्यात असलेल्या रिक्त पदांमुळे जिल्ह्याच्या आरोग्य सेवेवर परिणाम होत असून सध्या उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील रिक्त पदांवर लवकरात लवकर भरती व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. ग्रामीण भागात खासगी रूग्णालयांची संख्या कमी असल्याने आरोग्य सुविधा देण्याची जबाबदारी प्राथमिक आरोग्य केंद्रांचीच आहे. ग्रामीण भागात डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, कॉलरा, अशा अनेक संसर्गिक आजारांची भर पडत असते.

आरोग्य खात्यामध्ये प्राथमिक आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक, सामान्य कर्तव्य वैद्याधिकारी, तज्ज्ञ वैद्य, नर्स, औषध तज्ज्ञ अधिकारी, कनिष्ठ आणि वरिष्ठ प्रयोगाला तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, नेत्र आणि दंत तज्ज्ञ अशा अनेक जागा रिक्त आहेत. प्राथमिक आणि तालुका आरोग्य केंद्रात नर्सिंग स्टाफ कमी असल्याने आरोग्य सेवेवर परिणाम जाणवू लागला आहे.

गरिब आणि गरजू लोकांना देखील वेळेत आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसल्याने खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. ग्रामीण भागात ही समस्या गंभीर झाली आहे. केवळ आरोग्य विभागातील याच जागा रिक्त नसून प्रथम दर्जा, द्वितीय दर्जा सहाय्यक, लेखनिक, वाहनचालक अशा ड दर्जाच्या जागा देखील रिक्त आहेत.

जिल्ह्यात 1723 जागा आरोग्य कुटुंब कल्याण खात्यात रिक्त असून त्यात अ गट 106, ब गट 10, क गट 980 तर ड गटातील 627 जागा भरावयाच्या आहेत. कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्याने सेवेवर असलेल्या इतर कर्मचार्‍यांना आपल्या विभागासह इतर विभागातील अतिरिक्त जबाबदारी देखील सांभाळावी लागत आहे. त्यामुळे सध्या आरोग्य खात्यात कामाचा बोजादेखील वाढला आहे.

यात प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्याधिकार्‍यांची गरज अधिक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जगा भरल्या जात नसल्याने आरोग्य सुविधाचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर कर्मचारी भरती करावी, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.