नद्या आणि समुद्राच्या पाण्याखाली अनेक रहस्य दडली असून ज्यापासून मानव अद्यापही अनभिज्ञ आहे. सध्या खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी मात्र याला अपवाद ठरत असून पावसा अभावी असोगा पुराच्या ठिकाणी कोरड्या पडलेल्या या नदी पात्रातील वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेल्या पाषाणांचा नैसर्गिक चमत्कार सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
यंदा मान्सूनचे आगमन लांबून पावसाने प्रचंड ओढ दिल्यामुळे खानापूर तालुक्यातील मलाप्रभा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. नदीला पाणीच नसल्यामुळे समस्या निर्माण झाली असली तरी दुसरीकडे अभ्यासू चिकित्सक मंडळींसाठी नदीचे कोरडे पडलेले पात्र कुतूहलाचा विषय ठरत आहे.
कारण नदी तळाशी असलेला नैसर्गिक चमत्कार सध्या पहावयास मिळत आहे. विशेष करून धार्मिक स्थळ असलेल्या असोगा येथे आणि तेथील पुलाच्या ठिकाणी कोरड्या पडलेल्या मलप्रभेचा बहुतांशपणे पाषाणाचा असलेला तळ लक्षवेधी ठरत आहे.
निसर्गाचा चमत्कार असलेल्या या पाषाणातील उघड्यावर पडलेल्या ठीक ठिकाणच्या छोट्या छोट्या डोहांमध्ये अजूनही नितळ स्वच्छ पाणी पहावयास मिळत आहे. त्याचप्रमाणे येथील मोठमोठ्या पाषाण अर्थात दगडांवर सुकलेल्या शेवाळ वनस्पतीच्या पांढऱ्या आकृत्या नदीपात्राच्या नैसर्गिक सौंदर्यात एक वेगळी भर घालताना दिसतात.
सध्या हे शेवाळं पूर्णपणे सुकून गेलेलं मृत भासत असलं तरी चमत्कार म्हणजे नदीला पाणी येताच ते पुन्हा बहरात येत. या ठिकाणी नदीच्या तळाशी असलेल्या कांही पाषाणांची रचना आश्चर्यात टाकणारी आहे.
या खेरीज नदीपात्रात दुर्गम ठिकाणी असलेल्या कांही पाषाणांवर मानवी पावलांचे ठसे उमटलेले आहेत असे समजते. ही बाब अत्यंत आश्चर्यकारक अतर्क्य म्हणावी लागेल.