बेळगाव लाईव्ह : नाशिक आणि नागपूरच्या धर्तीवर बेळगावमध्ये उड्डाणपूल उभारण्याच्या कामाचा प्रस्ताव आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मांडला.
राष्ट्रीय महामार्गावरून बेळगाव शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावर उड्डाणपूल उभारण्यात यावेत असा प्रस्ताव सतीश जारकीहोळी यांनी मांडला असून उड्डाणपूल व सर्व्हिस रोड बांधण्याच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत आमदार आसिफ (राजू) सेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांनी आज मंगळवारी (१३ जून) गांधीनगर येथील महांतेश नगरजवळ जागेची पाहणी केली.
बेळगाव जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव शहराच्या वाहतूक समस्येवर प्रतिक्रिया देत पहिल्याच बैठकीत शहरातील उड्डाणपूल बांधण्यास हिरवी कंदील दाखविला.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत उड्डाणपुलाच्या बांधकामाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. बैठकीनंतर बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार राजू सेठ, बेळगावचे डीसी नितेश पाटील, शहर पोलिस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.