Saturday, January 18, 2025

/

‘त्या’ तिघांनी मागितला बडतर्फ करण्यामागचा खुलासा!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात राष्ट्रीय पक्षांचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत बडतर्फीच्या कारवाईचा ठराव करण्यात आला. एस. एल. चौगुले, सरोजनी चौगुले आणि अशोक चौगुले या तिघांवर तालुका म. ए. समितीच्या २६ मे रोजी झालेल्या बैठकीत सदर ठराव करण्यात आला. त्यामुळे आता चौगुले कुटुंबियांनी आमच्यावर कशाच्या आधारावर आणि कोणाच्या सांगण्यावर कारवाई करण्यात आली, असा सवाल तालुका समिती कार्याध्यक्ष मनोहर किणेकर आणि सरचिटणीस अ‍ॅड. एम. जी. पाटील यांना केला आहे. शिवाय आरोपांची पडताळणी न करता ठराव संमत करण्यात आला आहे, असाही आरोप देखील करण्यात आला आहे.

प्रसिद्धी पत्रकात सरोजनी चौगुले यांनी, मी अनेक वर्षांपासून राजकारणापासून दूर झाले आहे. आता राजकारणाशी काहीही संबंध नसताना बैठकीत माझ्या नावाचा उल्लेख करून मी समितविरोधात प्रचार केला, असा आरोप करण्यात आला. मी कधी आणि कोणाचा प्रचार करायला कुठे गेले होते याचा खुलासा करण्यात यावा. आरोपांची शहानिशा न करता बैठकीत माझ्या नावाची बदनामी करुन ठराव पास करण्यात आला. त्याला उपस्थित लोकांनी दुजारी दिला. त्यामुळे याचा खुलासा करण्यात यावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असे नमूद केले आहे.

एस. एल. चौगुले यांनी, मी समितीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. समितीच्या बळकटीसाठी, उमेदवार निवडून आणण्यासाठी, आंदोलनांसाठी आणि हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक उभारणीसाठी स्वत:चे लाखो उपये खर्च केले आहेत. समितीसाठी लाठ्या खाल्या, तुरूंगवासही भोगला आहे. माजी आमदार जी. एल. अष्टेकर आणि बी. आय. पाटील यांच्या सांगण्यावरून मी माझ्या खर्चातून हिंडलग्यातील हुतात्मा स्मारक बांधले आहे. माझ्यावर आरोप करणार्‍यांनी स्वत: आत्मपरिक्षण करावे. सीमाप्रश्न सुटेपर्यंत मी कोणत्याही पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही. मी सरकारी कंत्राटदार असल्यामुळे लोकप्रतिनिधींचा आदर करणे माझे कर्तव्य आहे. तरीही कामावेळेचे फोटो व्हायरल करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. मला समितीतून हकालपट्टी करण्याचा अधिकार कोणाला नाही. कामानिमित्त कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या घरी, कार्यालयात जाण्यावर तुमचा आक्षेप असेल तर मला कळवावे, असे नमूद केले आहे.

अशोक चौगुले यांनी, मी बांधकाम अभियंता असून मी कोणत्याही संघटनेचा सदस्य किंवा पदाधिकारी नाही. पण, माझी जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आली आहे. उमेदवाराला पराभव जिव्हारी लागला आहे. पण, त्याचे खापर माझ्यावर फोडण्याचा अधिकार नाही. स्वत:चे अपयश लपवण्यासाठी दुसर्‍याची बदनामी करणे योग्य नाही. आता पाठीशी घालणार्‍यांमुळेच मागच्या निवडणुकीत पराभव झाला, हे जनता विसरलेली नाही. त्यामुळे मागच्या निवडणुकीत पराभवाला जबाबदार असणार्‍यांची नावे जाहीर करावीत. माझ्यामुळे पराभव झाला असे म्हणणे हास्यास्पद आहे, असे नमूद केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.