महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील भंडोरा येथे एका दलित युवकाचा निर्घृण खून करणाऱ्या मारेकर्यांना लवकरात लवकर गजाआड करून त्यांना कठोर शासन करावे, अशी मागणी ऑल इंडिया सफाई मजदूर काँग्रेस कर्नाटक शाखेने एका निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
ऑल इंडिया सफाई मजदूर काँग्रेसचे कर्नाटक राज्य अध्यक्ष काशीराम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना धाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून पुढील योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील भंडोरा येथे गेल्या 1 जून रोजी अक्षय भालेराव या दलित युवकावर कांही समाजकंटकांनी हल्ला करून त्याचा निर्घृण खून केला आहे.
अक्षयचा गुन्हा एवढाच की तो दलित समाजातील असण्याबरोबरच त्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात भाग घेतला होता. तेंव्हा बेळगाव जिल्ह्यातील हजारो दलित समाज बांधवांसह संपूर्ण कर्नाटकातील दलित बांधवांची आपल्याला विनंती आहे की अक्षय भालेराव यांच्या खुनाचा तपास युद्धपातळीवर पूर्ण केला जावा.
तसेच खुनास कारणीभूत असलेल्यांवर दलित अत्याचार कायद्यासह इतर संबंधित कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवून त्यांना कठोर शासन दिले जावे. आपण आम्हा बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण कर्नाटकातील लाखो दलित बांधवांच्या भावना जाणून घेऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही कराल ही अपेक्षा आहे, अशा आशयाचा तपशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धाडलेल्या निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना ऑल इंडिया सफाई मजदूर काँग्रेसचे राज्याध्यक्ष काशीराम चव्हाण यांनी खुनाच्या घडलेल्या घटनेची माहिती देऊन हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये द्वेष पसरवण्यासाठी हा हे निंद्य कृत्य करण्यात आले आहे असे सांगितले. हिंदू विशेष करून दलित आणि मुस्लिम समाजात द्वेष पसरण्याचे काम करणारे लोकच या कृत्या जबाबदार आहेत.
या लोकांनीच समाजकंटक मारेकऱ्यांचे ब्रेन वॉश करून त्यांना भडकविले आणि खुनास उद्युक्त केले आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला. याप्रसंगी संघटनेचे अन्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.