बेळगावात मान्सूनची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असून काल शुक्रवारी थोडाफार शिडकावा झाल्यानंतर आज शनिवारी सकाळी कित्तूर चन्नम्मा सर्कल परिसरात अल्पकाळ मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.
हवामान खात्याचा अंदाजानुसार आज शनिवारपासून मान्सूनचा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. कांही दिवसांपासून शेतकरी आणि नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तथापी पाऊस लांबल्यामुळे सध्या जलाशयं आणि विहिरींनी तळ गाठला असून सर्वत्र पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस लांबला असल्याचे हवामान खात्याकडून सांगितले जाते. पाऊस नसल्यामुळे एकीकडे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.
मागील चार दिवसापासून सकाळी ढगाळ वातावरण आणि दुपारनंतर कडक ऊन असे चित्र पहावयास मिळत होते.
काल दिवसभर तसेच आज सकाळपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रलंबित मान्सूनला आता प्रारंभ होणार असल्याचा अंदाज अनेकांकडून वर्तविला जात आहे.