बेळगाव लाईव्ह : कर्नाटक मधील काँग्रेस सरकारने इयत्ता आठवी आणि इयत्ता दहावीच्या कन्नड विषयाच्या पाठ्यपुस्तकातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते हेगडेवार यांच्यावरील धडे वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
अंदमान तुरुंगातील प्रवास वर्णनावर आधारित ‘कलावनु गिद्देवरू’ या के. टी. गट्टी यांनी लिहिलेल्या धड्याचा समावेश इयत्ता आठवीच्या कन्नड विषयाच्या पाठ्यपुस्तकात करण्यात आला होता. तर इयत्ता दहावीच्या पाठ्यपुस्तकात हेगडेवार यांच्यावर आधारित धड्याचा समावेश करण्यात आला होता. याचप्रमाणे चक्रवर्ती सुलिबेले यांनी लिहिलेल्या राजगुरू, भगतसिंग आणि सुखदेव यांच्यावर आधारित धड्यांचाही समावेश होता. मात्र काँग्रेस सरकारने हे सर्व मजकूर पाठ्यपुस्तकातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना शिक्षण मंत्री मधू बंगारप्पा यांनी सांगितले, कि मंत्रिमंडळाने सदर मजकूर वगळण्याचा निर्णय घेतला आहे. हा मजकूर भाजप सरकारने शालेय पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमासंदर्भात सतत मार्गदर्शन करत आहेत. राजप्पा दळवाई, प्रा. चंद्रशेखर, राजेश, अस्वथ नारायण यांच्या समितीने ४५ परिच्छेद बदलण्याची सूचना केली असून पाठ्यपुस्तकातील शब्दरचना बदलण्याची विनंतीहि करण्यात आली आहे. काँग्रेस सरकारच्या वतीने इयत्ता सहावी ते दहावीच्या कन्नड आणि समाज विषयाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्यात येत असून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित मजकुराचा समावेश करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना काय शिकवायचे याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन तत्वे देण्यात येणार असून आधीच पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आल्यामुळे आता ती परत घेतल्यास पुन्हा कोट्यवधी रुपयांचा खर्च करावा लागेल, असे ते म्हणाले. इयत्ता सहावी ते दहावीच्या सामाजिक शास्त्राची पुस्तके बदलण्यात आली असून नव्या पाठ्यपुस्तकात कोणता मजकूर आवश्यक आहे तितकाच मजकूर समाविष्ट करण्यात आला आहे. अनावश्यक मजकूर काढून टाकण्यात आला असून काढलेल्या मजकुराच्या जागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरू यांच्यावर आधारित मजकूर समाविष्ट करण्यात आला आहे.
राज्यघटनेची प्रस्तावना शाळांमध्ये वाचायला हवी यासाठी विशेष भर देण्यात आल्याचे मधुबंगारप्पा यांनी सांगितले. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शाळांमध्ये राष्ट्रगीताबरोबरच संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान शालेय पाठ्यपुस्तकातील वगळण्यात आलेल्या मजकुरामुळे भाजपने नाराजी व्यक्त केली असून काँग्रेस शिक्षणात देखील राजकारण करत जातीय सलोख्याचे नाटक करत असल्याची टीका भाजप नेते रवीकुमार यांनी केली आहे.