बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा दारुण पराभव झाला. या दारूण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज आपल्या पदाचे राजीनामे दिले.
शुक्रवारी खानापूर शिवस्मारक मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीची चिंतन बैठक व विविध विषयासंदर्भात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई होते.
यावेळी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नुकताच झालेल्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची कारणमीमांसा तसेच खानापूर शासकीय रुग्णालयातील नवीन इमारतीवर मराठीमध्ये फलक लावण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती.
या बैठकीत महाराष्ट्र एकिकरण समितीची संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. पण त्यापूर्वी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचे राजीनामे देऊन नवीन होतकरू व संघटनेची निष्ठावंत असणाऱ्या कार्यकर्त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात यावी असा सर्वांमध्ये निर्णय घेण्यात आला.
यावेळी अनेकांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनाम्याची जोरदार मागणी केली. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिरजे, सचिव सिताराम बेडरे, खजिनदार संजीव पाटील यांनी • आपण निवडणुकीत कार्यप्रणाली राबवण्यात कुठेतरी अपयशी ठरलो. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदातून मुक्त होत आहोत. व आपल्या पदाचे राजीनामे देत असल्याचे त्यांनी यावेळी घोषित केले. त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नूतन कार्यकारिणीची रचना करण्यासाठी लवकरात लवकर क्रम हाती घेऊन निर्णय घेण्यात यावे असा ठराव करण्यात आला. व तोपर्यंत समितीचे जेष्ठ माजी आमदार दिगंबर पाटील, माजी सभापती मारुती परमेकर यांच्याकडे तात्पुरती जबाबदारी देण्यात यावी असे सर्वानुमते संमत करण्यात आले
यावेळी आबासाहेब दळवी, नारायण कापोलकर, निरंजन सरदेसाई, अर्जुन देसाई. रमेश धबाले, राजाराम देसाई. महादेव घाडी, अमृत शेलार, आदींनी यावेळी विचार मांडले. या बैठकीला खानापूर विभागातील म. ए. समितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.