बेळगाव लाईव्ह : कणबर्गी येथील मुख्य रस्त्याचे कामकाज गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. हि बाब गांभीर्याने घेत उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज या परिसराला भेट देत अधिकारी आणि ठेकेदारांना खडसावले.
कणबर्गी गावच्या प्रवेशद्वारापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपर्यंत आणि त्यापुढील मुख्य रस्त्याचे बांधकाम सहा महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र अचानक हे काम मध्येच थांबवण्यात आले. अर्धवट स्थितीत असलेल्या या कामकाजामुळे या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना कसरत करावी अंगात होती. महिनाभरापूर्वी झालेल्या वळिवाच्या पावसामुळे अनेक वाहनधारक व पादचारी मातीत घसरून पडून गंभीर जखमी झाले होते. यानंतर या रस्त्याचे कामकाज तातडीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी नागरीकातून होत होती. या पार्श्वभूमीवर असिफ (राजू) सेठ यांनी या परिसराला भेट देऊन पाहणी केली आणि येथील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या.
यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना बोलावून प्रलंबित काम पूर्ण करण्याच्या सूचना देत अधिकारी आणि ठेकेदाराला चांगलेच फैलावर घेतले. आपण जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आहोत. यामुळे जनतेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे.
अशा पद्धतीने बेजबाबदारपणे तुम्ही कसे काय काम करू शकता असा प्रश्नदेखील आमदारांनी अधिकारी आणि ठेकेदारांना केला. या रस्त्याचे कामकाज उद्यापासून तातडीने सुरु करण्यात यावे, कामाचा दर्जा राखण्यात यावा अशा सूचनाहि आमदार असिफ (राजू) सेठ यांनी यावेळी दिल्या.
यावेळी स्थानिक नगरसेविका, स्मार्ट सिटीचे अधिकारी व स्थानिक रहिवासी उपस्थित होते.