Friday, March 29, 2024

/

महाराष्ट्रात सामील होण्याच्या निर्धारासह हुतात्म्यांना अभिवादन

 belgaum

बेळगाव मध्यवर्ती, शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना, महिला आघाडी, युवा आघाडीतर्फे बेळगावसह सीमा भागातील समस्त मराठी भाषिकांच्यावतीने 1986 च्या कन्नड सक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आज गुरुवारी 1 जून रोजी हुतात्मा स्मारक, हिंडलगा येथे भावपूर्ण वातावरणात गांभीर्याने पार पडला. यावेळी पुनश्च नव्या जोमाने महाराष्ट्रात सामील होण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

कर्नाटक सरकारने लागू केलेल्या कन्नड सक्ती विरोधात 1986 मध्ये मोठे आंदोलन झाले. या आंदोलनात भरमाण्णा कदम (सुळगे), मोहन पाटील (सुळगे), भावकू चव्हाण (बेळगुंदी), कल्लाप्पा उचगावकर (बेळगुंदी), परशराम लाळगे (उचगाव), शंकर खन्नूकर (जुने बेळगाव), मारुती गावडा (बेळगुंदी) विद्या शिंदोळकर (हिंदवाडी) आणि प्रकाश बाळू पाटील (विजयनगर) हे सर्वजण हुतात्मे झाले.

या सर्व हुतात्म्यांना दरवर्षी 1 जून रोजी अभिवादन करून मराठी भाषिकांकडून महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार व्यक्त केला जातो. त्यानुसार आज गुरुवारी सकाळी हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम गांभीर्याने पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चंदगडचे आमदार राजेश पाटील उपस्थित होते. प्रारंभी आमदार पाटील यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर आणि खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी अमर रहे अमर रहे हुतात्मे अमर रहे, महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो, बेळगाव -कारवार -निपाणी -बिदर -भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

 belgaum

हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहण्यात आल्यानंतर मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, जनसंपर्कप्रमुख विकास कलकटगी, युवा नेते आर. एम. चौगुले, रमाकांत कोंडुसकर, ॲड. अमर येळूरकर, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, मदन बामणे, खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील, मुरलीधर पाटील, गोपाळ पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, आर. आय. पाटील, ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, माजी ता. पं. सदस्य कृष्णा हुंदरे, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेेकर आदींनी हुतात्मा स्मारकाला फुले वाहून अभिवादन केले.

यावेळी बोलताना चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी सीमाप्रश्न आणि आपला पर्यायाने चंदगड, आजरा, गडहिंग्लज या तालुक्यांचा गेल्या अनेक वर्षापासूनचा संबंध असल्याचे सांगितले आपण सर्वांनी कर्नाटक विधान सभेची नुकतीच झालेली निवडणूक एकजुटीने लढावली. यावेळी शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी समितीच्या विरोधात कोणताही उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. या वेळचे वातावरण चांगले असल्यामुळे दोन ते तीन जागांवर आपले उमेदवार निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र दुर्दैवाने तसे घडले नाही. राजकारणात यश अपयश हे असते तेव्हा आपण उमेद न सोडता खचून न जाता पुन्हा त्याच ताकदीने आणि आत्मविश्वासाने सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लढत राहिले पाहिजे असे सांगून यासाठी महाराष्ट्र सरकारकडे तगादा लावला पाहिजे मी त्यासाठी माझ्या परीने कायम प्रयत्नशील राहणार आहे, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.Ramakant

युवा नेते आर. एम. चौगुले यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, बेळगाव सीमाभागातील मराठी बांधव आपली मायभूमी महाराष्ट्रात जाण्यासाठी गेली 66 वर्षे प्रयत्न करत आहे. यासाठी अनेकांनी आपले रक्त सांडले आहे या सर्वांची जाणीव आपण ठेवली पाहिजे. प्रत्येकाने यापुढे मरगळ झटकून नव्या जोमाने बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी आपला लढा पुढे जारी ठेवला पाहिजे. हा एक लढा यशस्वी झाला तरच खऱ्या अर्थाने हुतात्म्यांना अभिवादन केल्यासारखे होईल. तेंव्हा सीमा भागातील प्रत्येक कार्यकर्त्याने यापुढे जोपर्यंत सीमा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत या चळवळीत एकजुटीने मनापासून सहभागी व्हावे.

ॲड. अमर येळ्ळूरकर यांनी समयोचित विचार व्यक्त करताना 1985 मध्ये कन्नड सक्ती झाली मात्र कर्नाटक सरकारने त्याचे कायद्यात रूपांतर केल्या मार्च 2021 मध्ये केले आहे. तो कायदा जर पाहिला तर सीमा भागात मराठी भाषिकांचे जगणे कठीण होणार आहे. त्यामुळे हुतात्म्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली व्हायचे असेल तर आपण सर्वांनी त्या कायद्याला विरोध केला पाहिजे त्यासाठी संघर्ष केला पाहिजे असे स्पष्ट केले. जोपर्यंत कन्नड सक्ती मागे घेतली जात नाही आणि सीमा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आपल्या लढा लढ्याची धार कमी होता कामा नये. निवडणुका येतात आणि जातात. निवडणूक लढवणे हा सीमा चळवळीचा एक भाग आहे. मात्र आपला खरा लढा मराठी भाषा टिकवणे, मराठी संस्कृती टिकवणे आणि महाराष्ट्रात सामील होण्यासाठीचा आहे. यासाठी सर्वांनी संघटित राहणे अत्यावश्यक आहे असे सांगून कन्नड सक्ती कायदा मंजुरीसाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे जाण्यापूर्वी आपण नजीकच्या काळात भव्य मोर्चा काढून सरकार दरबारी निषेध नोंदविला पाहिजे, असेही ॲड. येळ्ळूरकर यांनी सुचविले.

आजच्या हुतात्मा अभिवादन कार्यक्रमाचे औचित्य साधून युवा नेते रमाकांत कोंडुसकर आणि समस्त कोंडुसकर परिवारातर्फे हुतात्मा स्मारकाच्या विकासासाठी 1 लाख रुपयांची देणगी देण्यात आली. चंद्रकांत कोंडुसकर यांनी सदर रकमेचा धनादेश समितीचे खजिनदा कडे  सुपूर्द केला. याप्रसंगी नगरसेवक शिवाजी मंडोळकर, ॲड. सुधीर चव्हाण, महादेव पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, नगरसेविका सुधा भातकांडे, दत्ता जाधव ॲड. महेश बिर्जे, धनंजय पाटील ,अनंत पाटील, गणेश दड्डीकर, बी. डी. मोहनगेकर, माणिक होणगेकर आदींसह शहर व तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, महिला आघाडी, युवा आघाडी व युवा समितीचे पदाधिकारी, समिती कार्यकर्ते आणि मराठी भाषिक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी सीमाप्रश्नासह कन्नड सक्ती विरोधातील लढा तीव्र करण्याचा आणि महाराष्ट्रात सामील होण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस ॲड. एम. जी. पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.