बेळगाव लाईव्ह : चालू महिन्यात हेस्कॉमकडून वाढीव वीजदराने बिले देण्यात आली असून यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. चालू महिन्यात देण्यात आलेल्या बिलात दुप्पट वाढ झाल्याने गेल्या ४ – ५ दिवसांपासून नागरिक सरकार आणि हेस्कॉम विरोधात तीव्र संताप व्यक्त करत आहेत. आज बेळगावमधील सामाजिक कार्यकर्ते आणि मानवाधिकार कार्यकत्यांनी बेळगावच्या नेहरू नगर कार्यालयात धडक देत विभागीय अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारत घेराव घातला.
यावेळी बोलताना विभागीय अधिकारी प्रकाश व्ही. म्हणाले, वाढीव वीजदराबाबत वरिष्ठ पातळीवरून आपल्याला आदेश आला आहे. या आदेशानुसार या महिन्यात वीजबिल देण्यात आले आहे. याबाबत आपण वरिष्ठांशी चर्चा करून नागरिकांना नक्कीच दिलासा मिळवून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले. शिवाय नागरिकांना या चालू महिन्याचे बिल अदा करावेच लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नागरिकांनी ऑनलाईन पेमेंट सुविधा बंद केल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. आज प्रत्येकाकडे ऑनलाईन पेमेंट ची सुविधा उपलब्ध आहे. मात्र केवळ हेस्कॉमकडे ऑनलाईन क्यू आर कोड का नाही? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. यावर बोलताना त्यांनी सांगितले कि, हि सुविधा भारत बिल पे सर्व्हिस अंतर्गत सुरु होती. मात्र काही कारणास्तव हि सध्या बंद झाली आहे. लवकरच यासंदर्भातदेखील आपण वरिष्ठांशी चर्चा करून ऑनलाईन पेमेंट सुविधा पूर्ववत करून देऊ. उपस्थित नागरिकांनी निवेदन सादर केल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी गृहज्योती योजनेबाबत सविस्तर माहिती दिली.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यातील जनतेला ५ हमी योजना लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारला आता या योजनेची अम्मलबजावणी करताना कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
मोफत योजना जारी केल्यामुळे राज्याच्या सरकारी तिजोरीवर अधिक भर पडणार आहे. एकीकडे मोफत योजनांची घोषणा आणि दुसरीकडे नागरिकांच्या खिशातून दुपटीने वसूल करण्यात येणारा महसूल यामुळे पहिल्याच टप्प्यात काँग्रेस सरकारला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
२०० युनिट मोफत वीज देण्याची घोषणा काँग्रेसने केली होती. मात्र आता २०० युनिट मोफत विजे ऐवजी दुप्पट रक्कम नागरिकांच्या खिशातून वसूल करून घेण्यात येत असल्यामुळे नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.